Pune : ख्याल गायकीतून कलाकाराच्या सर्जनशीलतेला मिळतो वाव : पंडित सत्यशील देशपांडे

ख्याल गायकी म्हणजे कलाकाराचा आत्माविष्कार

एमपीसी न्यूज : ख्याल हा ध्रुपदानंतर अस्तित्वात आला आहे, तो शब्दप्रधान नाही. ख्याल गायनामुळे गायकाला आत्मविष्कारासाठी आवश्यक तो अवकाश, आसमंत उपलब्ध झाला. (Pune) ख्याल गायनामुळे गायकाच्या व्यक्तिगत संवेदनांना, भावस्थितींना वाव मिळू लागला, असे ख्याल गायकीविषयीचे विश्लेषण पंडित सत्यशील देशपांडे यांनी केले.

ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्‌‍सतर्फे ‘ख्याल विमर्श’ या चर्चा आणि सादरीकरण सत्रा अंतर्गत आयोजित मालिकेविषयी पंडित देशपांडे यांनी संवाद साधला. या मालिकेतील अखेरचे सत्र शनिवार, दि. 15 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता गांधर्व महाविद्यालय, शनिवार पेठ येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या वेळी ते ‘विविध रचानाकारांची सांगीतिक व्यक्तिमत्वे’ या विषयावर संवाद साधणार आहेत.

ख्यालाविषयी सविस्तर विवेचन करताना पंडित देशपांडे म्हणाले, शब्दांच्या भाषिक अर्थापुढे जाऊन त्यांच्यात दडलेल्या मृदू-कठोर आघातक्षमतेचा, नृत्यमयतेचा, नादमयतेचा, उच्चारातील सुप्त अभिनयाचा कलात्मक उपयोग ख्याल गायनात केला जातो. कलाकाराला आपल्या भावस्थितीनुसार राग वाकवता येणे, स्वरांची वळणे बदलणे असे प्रवाहीपण ख्याल गायनातून सादर करता येते.

संगीत क्षेत्रातील घराण्यांपरत्वे ख्यालाची मांडणी बदलते. प्रत्येक गायक आपल्या घराण्याच्या संस्कारांप्रमाणे, उत्स्फूर्तपणे आपल्या कलाविलासाच्या ताकदीनुसार ख्याल गायनात रंग भरतो ही ख्यालाची खासियत आहे. आवर्तनांच्या मालिकेतून ख्याल सिद्ध होतो. (Pune) कोऱ्या कॅनव्हासवर चित्रकार ज्या प्रकारे आपल्या कल्पनाशक्तीला वाव देत चित्र रेखाटतो त्या प्रमाणे राग-तालाच्या व्याकरणाची चौकट न मोडता गायक नवनिर्मितीचा आनंद घेत ख्याल प्रस्तुती करतो.

Pune : रिक्षाचा टायर व बॅटरी चोरणारा अट्टल चोर जेरबंद

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि पाश्चिमात्य संगीत सादरीकरणाची पद्धती पूर्णपणे भिन्न आहे. पाश्चिमात्य संगीतात पूर्वनिश्चित पद्धतीने सादरीकरण केले जाते; तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात गायकाला नवनिर्मितीचा आनंद घेत स्वत:तील सर्जनशीलतेला वाव देता येतो.

बंदिशींबाबत बोलताना पंडित देशपांडे म्हणाले, गायकाला ज्या पद्धतीने ख्याल गायचा आहे त्यानुसार बंदिशींची बांधणी-निर्मिती केली जाते. बंदिश हे रागाला नटविण्याचे साधन आहे, असे गुरू पंडित कुमार गंधर्व सांगत. एकाच रागात वेगवेगळी रूपे दाखविणाऱ्या बंदिशी असतात परंतु सगळा राग एकाच बंदिशीत नसतो. म्हणूनच वेगवेगळ्या कलाकारांचे रागाबद्दलचे कलाविचार प्रकट करण्यासाठी वेगवेगळ्या बंदिशी निर्माण झाल्या. तसेच स्थळपरत्वे, सांस्कृतिक, सामाजिक, भौगोलिक वैशिष्ट्यांनुसार लोकांच्या सौंदर्यदृष्टीत असणाऱ्या फरकांमुळे विविध रचनाकारांनी वैविध्यपूर्ण बंदिशींची रचना केली आहे.

लोकसंगीताला शास्त्र नाही ते स्वाभाविक-उपजत असे संगीत आहे. जशी भाषा उपजत आली नंतर व्याकरण आले, जसे कळीचे रुपांतर फुलात होते त्याप्रमाणे लोकसंगीतानंतर शास्त्र आले. लोकधुनेचा राग झाला म्हणजे त्याला सप्तक मिळाले, त्याच्या सांगीतिक बीजाचे विकसन झाले. (Pune) आजच्या काळात संगीत क्षेत्रातील घराण्यांमधील तटबंदी नाहीशा झाल्या आहेत. विविध घराण्यांमधील गायकी एकमेकांमध्ये विलिन झाली आहे, असे सांगून देशपांडे म्हणाले, घराण्यांचा संगीताकडे बघण्याचा दृष्टीकोन ओळखून एखादा राग समग्रपणे दर्शविण्यासाठी आजच्या पिढीने विविध घराण्यांच्या सादरीकरणातील सौंदर्य ओळखून संगीत क्षेत्रात वाटचाल करावी.

शनिवारी (दि. 15) होत असलेल्या ‘विविध रचानाकारांची सांगीतिक व्यक्तिमत्वे’ या सदरात गेल्या शंभर वर्षातील निवडक रचनाकारांबद्दल पंडित सत्यशील देशपांडे सोदाहरण सादरीकरण करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.