Pune Lonavala Local : पुणे-लोणावळा दरम्यान आजपासून दोन लोकल फेऱ्या वाढवल्या

एमपीसी न्यूज – पुणे-लोणावळा दरम्यान रेल्वे विभागाने दोन ( Pune Lonavala Local) रेल्वे फेऱ्या वाढवल्या आहेत. दुपारच्या वेळेत लोकल सोडण्याची मागणी केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने दोन फेऱ्यांची वाढ केली आहे.

 

करोना साथ काळात लोकल सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर सर्व रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आली. दरम्यान, करोना नंतर पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या दुपारच्या वेळेतील लोकल बंद करण्यात आल्या होत्या. दुपारच्या वेळेत देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यासाठी ब्लॉक घ्यावा लागत असल्याचे कारण रेल्वे विभागाकडून देण्यात आले होते.

 

Pune : आता महापालिकेच्या प्रयोग शाळांत खासगी रुग्णालयांना कोरोना चाचणी करण्याची परवानगी

 

दुपारच्या वेळेत लोकल नसल्याने विद्यार्थी, चाकरमानी आणि पर्यटकांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे दुपारच्या वेळेत लोकल सेवा सुरु करण्यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे विभाग आणि रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. संसदेत देखील बारणे यांनी पुणे-लोणावळा लोकल सेवेबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

 

दरम्यान, पुणे-लोणावळा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मागील आठवड्यात आंदोलनाचा पवित्रा घेत डेक्कन क्वीन ही रेल्वे गाडी तब्बल 20 मिनिटे अडवून ठेवली. त्यानंतर रेल्वे विभागाने पुणे-लोणावळा दरम्यान दोन फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार (दि. 15) पासून या फेऱ्या सुरु झाल्या आहेत.

 

शिवाजीनगर स्थानकावरून दुपारी 12.05 वाजता लोकल सुटेल. ही लोकल दुपारी 01.20 वाजता लोणावळा स्थानकावर पोहोचेल. तर लोणावळा स्थानकावरून सकाळी 11.30 वाजता लोकल सुटेल. ही लोकल दुपारी 12.45 वाजता शिवाजीनगर रेल्वे स्थानकावर ( Pune Lonavala Local) पोहोचेल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.