Pune Metro : एका आठवड्यात सव्वा दोन लाख प्रवाशांनी केला पुणे मेट्रोतून प्रवास ; मेट्रोला 32 लाख 45 हजारांचे उत्पन्न

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रो नागरिकांसाठी सुरु होऊन एक आठवडा झाला आहे. या कालावधीत पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील दोन लाख 27 हजार 950 नागरिकांनी मेट्रोतून प्रवास केला. यातून मेट्रोला 32 लाख 45 हजार 673 रुपये एवढे उत्पन्न मिळाले आहे.

पुणे मेट्रो सेवेला एक आठवडा पूर्ण झाला असून मेट्रोला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे 6 मार्च रोजी उदघाट्न झाले. त्या दिवशी दुपारी तीन वाजेनंतर वनाझ ते गरवारे आणि PCMC ते फुगेवाडी या दोन मार्गावर मेट्रो सेवेचा आरंभ झाला. दुपारी दोन वाजेनंतर स्थानकांकडे नागरिकांची रीघ सुरु झाली. पहिल्याच दिवशी तीन वाजेनंतर मोठ्या संख्येने नागरिक मेट्रोचा प्रवास करू लागले. पहिल्याच दिवशी 37 हजार 752 नागरिकांनी मेट्रोद्वारे प्रवास केला.

मेट्रोमध्ये प्रवास करण्याचे प्रत्येक पुणेकराचे स्वप्न होते आणि त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांनी 6 मार्च ते 13 मार्च दरम्यान मेट्रोमधून प्रवास केला. 13 मार्च रोजी तब्बल 67 हजार 350 नागरिकांनी मेट्रोतून प्रवास केला. एका दिवसात प्रवास करण्याची ही आठवड्यातील सर्वात मोठी संख्या होती. 13 मार्च रोजी मेट्रोला अधिकतम 10 लाख 7 हजार 940 रुपये उत्पन्न मिळाले. जेष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण, कुटुंबे आणि विविध प्रकारचे गट मोठ्या संख्येने मेट्रोमधून प्रवासासाठी येत आहेत. फोटो, सेल्फी, सोशल मीडियावर पोस्ट टाकणे याद्वारे पुणेकर आपल्या मेट्रो बद्दलच्या भावना व्यक्त करत आहेत. पुणे परिसरातील काही शाळेतील विद्यार्थी पुणे मेट्रोचा अनुभव घेण्यासाठी मेट्रो प्रवास करत आहेत.

आतापर्यंत मागील आठवड्यात दोन लाख 27 हजार 950 प्रवाश्यांनी मेट्रोद्वारे प्रवास केला. यातून एकूण 32 लाख 45 हजार 673 रुपये उत्पन्न मेट्रोला मिळाले. एकेदिवशी अधिकतम प्रवासी संख्या 67 हजार 350 होती व त्या दिवशी मेट्रोला 10 लाख सात हजार 940 रुपये उत्पन्न मिळाले. मागील आठवड्याचा विचार केल्यास सरासरी 34 हजार 243 नागरिकांनी प्रतिदिन प्रवास केला व त्याद्वारे सरासरी चार लाख पाच हजार 709 रुपये उत्पन्न मिळाले

प्रवाश्यांच्या सोयीसाठी पुणे मेट्रोने अँड्रॉइड व 105 मोबाईल अॅप उपलब्ध करून दिले आहे. आतापर्यंत 26 हजार 742 लोकांनी अॅप डाउनलोड करून त्याचा वापर सुरु केला आहे. मोबाईलद्वारे तिकीट काढण्याचे प्रमाण वाढले आहे. अधिकाधिक पुणेकरांनी मोबाईल अँपचा वापर करून पर्यावरण संवर्धनाला मदत करावी असे आवाहन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दिक्षित यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.