Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाईन 3 तर्फे ताथवडे कास्टींग यार्ड येथे ‘इको संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन

पुणे मेट्रो लाईन 3 च्या गाड्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – “मेट्रो प्रकल्प हा केवळ विशिष्ट शहराच्या नव्हे तर पूर्ण देशाच्या प्रगतीमध्ये लक्षणीय हातभार लावणारा असतो. त्यातच पुणे हे देशविदेशातील विद्यार्थ्यांसाठी प्रमुख महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून आकाराला आलेले असल्याने येथील विद्यार्थ्यांना वेगवान, सुरक्षित, प्रदूषणमुक्त परिवहन मिळवून देणारी मेट्रो रेल्वे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन 3 (Pune Metro Line 3) ही विद्यापीठाला देखील जोडणारी असल्याने तिचे आणखी आगळे महत्त्व आहे,” असे मत यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम यांनी व्यक्त केले. तसेच “प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांच्या अध्ययनात पाठबळ मिळावे या दृष्टीने पुणे मेट्रो लाईन 3 च्या गाड्यांमध्ये वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार अवश्य करावा,” असे खास जाहीर आवाहनही चोकलिंगम यांनी यावेळी पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेडला केले.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रो लाईन 3 (Pune Metro Line 3) च्या वतीने काल (रविवारी) ताथवडे कास्टींग यार्ड येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. चोकलिंगम बोलत होते. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोसाठी स्थापित विशेष उद्देश कंपनी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. सुहास दिवसे यावेळी उपस्थित होते.

DCM Ajit Pawar : यंदाच्या पालखी सोहळ्यात पंधरा लाख भाविक, अजित पवार यांनी दिली सविस्तर माहिती

श्री. चोकलिंगम, डॉ. दिवसे आणि श्री. कपूर यांच्यासमवेत पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडच्या संचालक नेहा पंडीत, प्रकल्प संचालक अक्षय शर्मा यांनी यावेळी उंबर, वड, पिंपळ, कांचन, कदंब, टिकोमा, कॅशिया, करंज, सावर इत्यादी स्थानिक (देशी) झाडांचे वृक्षारोपण केले. या नंतर मान्यवर पाहुण्यांच्या प्रकट मुलाखती घेण्यात आल्या. ज्यामध्ये एस. चोकलिंगम यांनी पर्यावरण विषयक जागरूकतेसाठी यशदातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबाबत तसेच मेट्रो परिवहनाकडे विद्यार्थ्यांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी काय करता येईल या बाबत मनोगत व्यक्त केले.

डॉ. सुहास दिवसे यांनी मेट्रो व रिंग रोडसारख्या महत्वाच्या प्रकल्पांबाबत आणि पुण्यातील ऐतिहासिक वारसा व औद्योगिक विकास यांची सुयोग्य सांगड घालण्यासाठी पीएमआरडीए करीत असलेल्या प्रयत्नांबाबत माहिती दिली. आलोक कपूर यांनी हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन 3 (Pune Metro Line 3) चे पुणेकरांसाठी असलेले महत्त्व विशद करून सांगितले तसेच मेट्रोच्या या मार्गिकेवर राबवण्यात येणाऱ्या हरित उपक्रमांची माहिती दिली.

“आयएएस अधिकारी असल्यामुळे तुमच्या दिमतीला मोठमोठ्या आलिशान गाड्या असतील परंतु तुम्ही आजवर कधी बैलगाडीतून प्रवास केला आहे का?” या प्रश्नाला उत्तर देताना पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे म्हणाले, “मी जरी पदवीने आयएएस असलो, तरी मनाने आजही वांगी गावचा एक शेतकरीच आहे. मी बैलगाडीतून फक्त भरपूर प्रवासच केला नसून बैल खरेदीही केली आहे. आजही माझ्या घरी दिवसाची सुरुवात रोज शेती, बैल, बियाणे, पीक याच विषयावर चर्चा करून होत असते.” असे पीएमआरडीएचे आयुक्त दिवसे यांनी सांगितले.

पीआयटीसीएमआरएलच्या संचालक नेहा पंडित यांनी उपस्थितांचे आभार मानले. निवेदक नितीश कामदार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

पुणे मेट्रो लाईन 3 बाबत माहिती – 

पुणे मेट्रो लाईन 3 हा हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणारा 23 किमीचा उन्नत मेट्रो रेल्वे प्रकल्प आहे. हा सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) प्रकल्प आहे, जो पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) द्वारे टाटा समूहाच्या ट्रिल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (TUTPL) आणि सिमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स (Siemens Project Ventures GmbH) यांचा समावेश असलेल्या कन्सोर्टियमला प्रदान करण्यात आला आहे. हा प्रकल्प डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर (DBFOT) तत्त्वावर पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेड या विशेष उद्देश कंपनी द्वारे 35 वर्षांच्या सवलतीच्या कालावधीसाठी विकसित आणि ऑपरेट केला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.