Pune News : ॲमेझॉन घोटाळ्यात साडेआठ हजार कोटीचा भ्रष्टाचार; भाजपचा पर्दाफाश करा – एच.के.पाटील

'काँग्रेसजनांनो, एकदिलाने महापालिका निवडणूक लढवा'

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने ॲमेझॉन घोटाळ्यात साडेआठ हजार कोटीचा भ्रष्टाचार केला आहे त्याचा पर्दाफाश करा आणि महापालिकेची आगामी निवडणूक एकदिलाने लढून जास्तीत जास्त जागा जिंका, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील यांनी केले.

पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील यांनी काँग्रेस भवनाला भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याप्रसंगी पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची मूर्ती देऊन आणि सूती हार घालून पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अ.भा. काँग्रेस चिटणीस सोनल पटेल, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, आरिफ नसिम खान, कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम आदी नेते उपस्थित होते.

केंद्रातील भाजप सरकारने जनतेचा अपेक्षाभंग केला आहे. महागाई, बेरोजगारी या समस्या उग्र झाल्या आहेत. कोरोनाची साथही नीट हाताळली नाही. खाजगीकरणाच्या नावाखाली अनेक सरकारी संस्था अदानी, अंबानी यांना सुपूर्द केल्या आहेत. कामगार कायदे बदलून कामगारांना असुरक्षित केले आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी ॲमेझॉनला मदत करण्यासाठी केंद्र सरकारने 8 हजार 546 कोटीचा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप पाटील यांनी केला. ॲमेझॉन घोटाळ्यामुळे छोटे व्यापारी आणि दुकानदारांचे नुकसान झाले, असे पाटील यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षाने सत्तेत असताना पुणे महापालिकेत विकासाची अनेक कामे केली. पुण्याला माहिती-तंत्रज्ञानाचे केंद्र केले. परंतु, खोटी आश्वासने देऊन महापालिकेत सत्तेत आलेला भाजप शहर विकास करण्यात अपयशी ठरला, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. सर्व घटकांना एकत्रित घेऊन काम करणाऱ्या काँग्रेसला पुणेकर यश देतील, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक दत्तात्रय बहिरट यांनी केले. महापालिकेतील पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.