Pune News : अखेर 23 गावांच्या विकासाचा मोकळा

एमपीसी न्यूज – राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने पुणे महानगरपालिका हद्दीत 23 गावांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत शासन निर्णय झाला असून, त्याची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होणार आहे. पुणे शहरा लगतच्या परिसराचाही पुणे शहराप्रमाणे विकास होण्याच्या दृष्टीने सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल महाविकास आघाडी सरकार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आभार मानले.

गेल्या अनेक वर्षांपासून बहुप्रतीक्षित अशा 23 गावांचा महापालिका हद्दीत समावेश झाल्याने या गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच, या गावांच्या समावेशामुळे पुणे महानगरपालिका ही भौगोलिकदृष्ट्या राज्यातील सर्वांत मोठी महानगरपालिका झाली आहे. पुणे हे शहर महानगर म्हणून विकसित झाले असून, त्या धर्तीच्या सुविधा या नव्याने समाविष्ट 23 गावांतही लवकरच उपलब्ध होतील. असे जगताप म्हणाले, या 23 गावांचा महानगरपालिकेत समावेश व्हावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर अजित पवार यांंच्या पुढाकारामुळे हा निर्णय झाला आहे.

आता बाणेर, बालेवाडी यांसारख्या महापालिकेत नव्याने आलेल्या भागाप्रमाणेच या 23 गावांचाही विकास होईल, यात काही शंका नाही. यापूर्वी राज्यात व महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असताना ज्याप्रकारे पुणे शहराचा चौफेर विकास करण्यास प्राधान्य देण्यात आले होते, ती विकासाची साखळी यापुढेही कायम राहणार आहे. सध्या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असून, आगामी महानगरपालिका निवडणुकीनंतर महापालिकेतही राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असेल. गेल्या साडेचार वर्षांपासून शहराच्या विकासाला जी खीळ बसली आहे, ती नक्कीच महापालिका निवडणुकीनंतर दूर होईल, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.