Pune News : डॉ.सलीम अली पक्षी अभयारण्य परिसर पक्ष्यांसाठी सुरक्षित करावा – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

एमपीसी न्यूज – डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य परिसरातील महसूल विभागाकडील क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून पक्ष्यांना सुरक्षित अधिवास मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

येरवडा येथील सलीम अली पक्षी अभयारण्यास भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार चेतन तुपे, माजी मंत्री सचिन अहिर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मनपा आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, उपवनसंरक्षक राहुल पाटील, अतिरिक्त मनपा आयुक्त राहुल खेमणार आदी उपस्थित होते.

मंत्री ठाकरे म्हणाले, गेल्या दोन वर्षापासून राज्य शासन वन वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहेत. पक्षी आणि वन्यजीवांना सुरक्षित अधिवास मिळणे गरजेचे आहे. पक्षी अभयारण्य परिसरात अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून संरक्षणाच्यादृष्टीने परिसरात पोलीसाची गस्त वाढविण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत तसेच गैरप्रकार होऊ नये म्हणून सीसीटीव्ही बसविण्याचा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

अभयारण्य परिसरात पुणे महानगरपालिकेने स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छता मोहिम राबवावी. नागरिकांनी या पक्षी अभयारण्याला भेट द्यावी आणि पर्यावरणाच्या दृष्टीने पुण्यातील हिरवे आच्छादन टिकवण्यासाठी झाडांची लागवड करावी असे आवाहन मंत्री श्री. ठाकरे यांनी केले.

पुण्यातील नागरिक पर्यावरणाप्रती जागरुक असून त्यांच्या सहकार्याने पुण्याला 2030 पर्यंत कार्बन न्यूट्रल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी अभयारण्य परिसरात होत असलेल्या कामांची माहिती दिली.

‘मेरी आवाज ही पहचान है’… पाहा संपूर्ण कार्यक्रम!

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.