Pune News : शाळेचा पहिलाच दिवस आणि शिक्षक म्हणून वर्गात आले ‘पोलीस’

एमपीसी न्यूज – तब्बल दीड वर्षाहून अधिक कालावधीसाठी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शाळा, महाविद्यालये बंद होती. कोरोनाचा जोर ओसरत असल्याने राज्यात सोमवारपासून शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. पण, पुण्यातील एका शाळेत पहिल्याच दिवशी वर्गात शिक्षक म्हणून पोलीस आले विद्यार्थ्यांचा क्लास घेतला.

झाले असे की, पोलीस भरतीची लेखी परिक्षा जवळ आली आहे. या लेखी परिक्षेसाठी पुण्यातील बी. टी सहाणी माध्यमिक शाळा हे एक केंद्र आहे. या परीक्षा केंद्राची पाहणी करण्यासाठी समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विष्णू ताम्हाणे आपल्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत शाळेत पोहचले.

यावेळी ताम्हाणे यांनी दहावीच्या वर्गाला अचानक भेट दिली. शाळेचे प्राचार्य पेशवानी यांनी ताम्हाणे यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली. त्यानुसार ताम्हाणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

ताम्हाणे यांनी विद्यार्थ्यांना, रिल लाईफ आणि रिअल लाईफ यामध्ये फरक असल्याचे सांगितले. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली मुलं मोबाईलच्या आहारी जात असल्याचे त्यांनी विषद केले. सदृढ पिढी घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचन करणे आवश्यक असल्याचे ताम्हाणे म्हणाले.

शाळेच्या पहिल्याच दिवशी पोलीसकाकांनी क्लास घेतल्याने मुलांना विशेष कुतुहल वाटले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.