Pune news: महापालिकेत आलेल्या नागरिकांना ताटकळत ठेवणे आता अधिकाऱ्यांना पडणार महागात

एमपीसी न्यूज : कामासाठी नागरिक महापालिकेत आले असता त्यांना खूप वेळ ताटकळत ठेवले जाते. मात्र आगामी काळात असे करणे, हे महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडणार आहे. कारण अधिकारी आपल्यासोबत कसा वागतो याबाबत आता नागरिक अभिप्राय देणार आहेत. त्यासाठी महापालिकेत नागरिकांना अभिप्राय नोंदवण्यासाठी अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिवाय याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गोपनीय अहवालात होणार मूल्यमापन केले जाणार आहे. याबाबतचे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी महापलिका प्रशासनाला दिले आहेत.

राज्य माहिती आयोग, कोकण यांच्याकडे दाखल ब्दितीय अपील वर निर्णय देताना प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाकडे अभिप्रायासाठी फॉर्म ठेवण्यात यावेत. हे फॉर्म ई-मेलव्दारे सेवा पुरविणाऱ्या नोडल प्राधिकरण पर्यवेक्षकाकडेही पाठविण्यात येतील. अभिप्रायाचे फॉर्म प्रत्येक तिमाहीला संबंधित अधिकान्यासमोर उघड करण्यात यावेत आणि सदर अधिकारी / कर्मचारी यांचे जनतेबरोबरचे वागणूकीबाबत त्याच्या गोपनीय अहवालात मुल्यमापन करण्यासाठी वापरण्यात यावेत, असे आदेश माहिती अधिकार अधिनियमाच्या कलम १९(८)(ऐ) अन्वये मा.राज्य माहिती आयुक्त, कोकण खंडपीठ यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग यांनी “प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाकडे अभ्यांगतांना अभिप्रायासाठी फॉर्म ठेवण्यात यावेत आणि सदर अधिकारी / कर्मचारी यांचे जनतेबरोबरचे वागणूकीबाबत त्याच्या गोपनीय अहवालात मुल्यमापन करण्यासाठी वापरण्यात यावेत, असे आदेश दिले होते. त्याचा आधार घेत महापलिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी देखील महापलिका प्रशासनाला आदेश दिले आहेत. त्यानुसार आता अधिकारी आणि कर्मचाऱ्याना नागरिकांसोबत चांगलेच वागावे लागणार आहे.

नागरिकांना अर्ज उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित विभागाची असेल. त्यानुसार त्या अर्जात या गोष्टी नमूद असतील. त्यामध्ये अधिकारी अथवा सेवकाचे नाव, पदनाम, अर्जदाराचे नाव, मोबाईल नंबर, नागरिकाच्या कामाचे स्वरूप आणि शेवटी नागरिकाचा अभिप्राय याचा यात समावेश असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.