Pune News: कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न, व्यापाऱ्यांचीही मागणी त्यामुळेच लॉकडाऊन उठवला- अजित पवार

कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्याने दररोज सुमारे दीड हजार रुग्ण वाढतेच आहे. या आजारामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

एमपीसी न्यूज – लाखो कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न, व्यापाऱ्यांचीही सातत्याने मागणी त्यामुळेच पुण्यातील लॉकडाऊन उठविण्यात आला आहे, अशी स्पष्ट कबुली उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

पुण्यातील लॉकडाऊन उठवण्याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा विरोध होता, असे शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यातच आता अजित पवार यांनीही त्याला दुजोरा दिला आहे.

पुणे शहर हे देशातील कोरोनाचा हॉटस्पॉट बनले आहे. मुंबई व दिल्ली या महानगरांनाही पुण्याने मागे टाकले आहे. कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्याने दररोज सुमारे दीड हजार रुग्ण वाढतेच आहे. या आजारामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस पुणे, पिंपरी – चिंचवड आणि जिल्ह्यात वाढतेच आहे. त्यामुळे आता खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच मैदानात उतरले आहेत.

शनिवारी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक मंत्री, आमदार व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यात लॉकडाऊन उठवण्याबाबत घाई झाल्याचे अजित पवार यांनी मान्य केले आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना अनेक नागरिक मास्क, फिजिकल डिस्टन्स पळताना दिसत नाही. त्यामुळे मास्क न घालणाऱ्या, कुठेही थुंकणार्‍यावर कारवाई करण्याचे आदेश पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत.

तर, पुणे शहरात आता कोरोनाचे तब्बल 1 लाख 3 हजार 812 रुग्ण झाले आहेत. आजपर्यंत 2 हजार 438 जणांचा मृत्यू झाला आहे. 85 हजार 371 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.