Pune : समाजातील दानशूरपणा, सामाजिक बांधिलकी टिकायला हवी – डॉ. राजा दीक्षित

एमपीसी न्यूज -“पैसे अनेक लोक कमवतात. आयुष्यात मिळवलेल्या या (Pune )संपत्तीचा उपभोग, विनियोग चांगल्या कामासाठी करता आला पाहिजे. समाजातील दानशूरपणा, सामाजिक बांधिलकी टिकली, तर समाजकार्य चांगल्या पद्धतीने उभे राहील.

अनेकांच्या पदरी गरिबी येते. मात्र, त्याचा न्यूनगंड न बाळगता (Pune )आत्मविश्वासाने वाटचाल केली, तर आपल्या कार्याला यश मिळते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी केले.

विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी कार्यकारी विश्वस्त कै. वसुधा परांजपे यांच्या स्मरणार्थ अन्नपूर्णा परिवाराच्या मेधा पुरव-सामंत यांना सामाजिक कार्यासाठी, तर स्वरूप-वर्धिनीचे शिरीष पटवर्धन यांना शैक्षणिक कार्यासाठी ‘वसुधा परांजपे स्मृती पुरस्कार’ डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख 50 हजार रुपये, मानपत्र व पुष्प असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी समितीतील पाच विद्यार्थिनींना प्रत्येकी 10हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले.

फर्ग्युसन रस्त्यावरील समितीच्या डॉ. अं. शं. आपटे वसतिगृहातील मोडक सभागृहात आयोजित सोहळ्यात ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. प्र. ना. परांजपे, विद्यार्थी साहाय्यक समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर यांच्यासह परांजपे कुटुंबीय, मित्र परिवार व समितीचे कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ. राजा दीक्षित म्हणाले, “शिक्षण व सामाजिक क्षेत्रांना एकमेकांना पूरक कार्य करावे लागते. सुखाची व्याख्या समजून घ्यायला हवी. समतेचे मूल्य अजूनही समाजात म्हणावे, तसे रुजलेले नाही. त्यामुळे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करताना समता, बंधुता समोर ठेवून काम करावे. स्वतःला वाहून घेणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी तयार होत राहायला हवी.”

Pune : महायुतीच्या मेळाव्याकडे उपमुख्यमंत्री पवार पाठोपाठ पाटील यांनीही मारली दांडी

मेधा पुरव-सामंत म्हणाल्या, “महिलांना भांडवलाचे महत्व आणि उत्पन्नाची साधने अधिक कळतात. त्यामुळेच अन्नपूर्णा परिवार विस्तारत गेला. महिलांना बचतीचा मार्ग शिकवला. त्यांच्यात आपलेपणा पेरला. सामाजिक उद्योग उभारण्यावर अन्नपूर्णा परिवाराने भर दिला. आज हजारो महिला सक्षमपणे आर्थिक व्यवहार करीत आहेत.”

शिरीष पटवर्धन म्हणाले, “गरिबीमुळे अनेक मुलांना चांगले शिक्षण घेता येत नाही. त्यांना योग्य वयात चांगली संगत, मार्गदर्शन मिळाले, तर त्यांच्यातील माणूस घडतो. चांगल्या कामासाठी समाज नेहमी मदतीचा हात देतो. किशाभाऊ पटवर्धन यांनी उभारलेल्या या संस्थेतून आजवर हजारो मुलांचे आयुष्य घडले. त्यातील अनेकजण सामाजिक जाणिवेतून काम करत आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे.”

डॉ. प्र. ना. परांजपे यांनी पुरस्कार देण्यामागील भूमिका स्पष्ट करताना वसुधा परांजपे यांना शिक्षण व सामाजिक कार्यात रस होता, अखेरपर्यंत ती या कार्यात कार्यरत होती. तिच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे सांगितले.

तुषार रंजनकर यांनी वसुधा परांजपे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. सूत्रसंचालन परिमल चौधरी यांनी केले. डॉ. उज्ज्वला बर्वे, अपर्णा महाजन यांनी सामंत व पटवर्धन यांच्या कार्याचा परिचय करून दिला. आभार विजया देव यांनी मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.