Pune: ‘होम क्वारंटाईन’च्या सल्ल्याचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाईचा पोलिसांचा इशारा

0

एमपीसी न्यूज – परदेशातून आलेल्या व होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आलेल्या नागरिकांनी त्याचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे. त्यासाठी 136 पोलीस पथके तयार करण्यात आली असून विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

परदेशातून भारतात परत आलेल्या नागरिकांनी 14 दिवस होम क्वारंटाईन म्हणजेच घरामध्येच विलगीकरणाच्या स्थितीत राहण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत. या मार्गदर्शक सूचनांचे पालन फारच कमी लोक करीत असल्याचे पोलीस पथकांनी केलेल्या तपासणीत आढळून आले आहे. काही जण शहरातच दुसऱ्या घरात राहायला गेले आहेत, काहीजण राज्यात अथवा देशातील त्यांच्या गावी गेले आहे तर काही जण बेपत्ता आहेत.

या सर्वांनी जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा 1800 233 4130 या कोरोना हेल्पलाइनवर संपर्क साधून त्यांच्या निवासस्थानाची तसेच त्या ठिकाणी आरोग्यविषयक दक्षतेसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती द्यावी. त्यामुळे संबंधितांच्या तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्यासाठी मदत होऊ शकेल, असे पोलिसांच्या पत्रकात म्हटले आहे. अशा व्यक्तींची कोणाला माहिती असेल तर ती पोलिसांना देऊन पुणेकर नागरिकांनी सहकार्य करावे, चला एकत्रितपणे कोरोनाची साखळी तोडूयात, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.  

या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व संबंधितांनी सहकार्य करावे, अन्यथा पोलिसांना दंडात्मक कारवाई करणे भाग पडेल. सार्वजनिक आरोग्यासाठी व सुरक्षिततेसाठी आपले कर्तव्य पार पाडण्यास पोलीस मागेपुढे पाहणार नाहीत, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like