मंगळवार, ऑक्टोबर 4, 2022

Pune : पुणे पोलिसांचा अजब कारभार; कारचालकाला हेल्मेटचा दंड!

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांचा अजब कारभार समोर आला आहे. हेल्मेटसक्ती शिवाय त्यांना इतर कोणतीही कारवाई दिसत नाही. त्यामध्ये पोलीस एवढे तल्लीन झालेत की कारचालकाला सुद्धा हेल्मेट न घालण्याचा दंड ठोठावून कारवाईचे वेगळेपण दाखवून दिले आहे. एका कारचालकाला हेल्मेट न घालता वाहन चालवल्याबद्दल 500 रुपये दंड करण्यात आला आहे. याचे छापील चलन देखील कारचालकाला मिळाले आहे.

प्रदीप पाटील यांच्याकडे स्विफ्ट कार आहे. तिचा पासिंग नंबर एमएच 12 / ई एक्स 4515 असा आहे. ही कार त्यांनी 16 सप्टेंबर 2008 रोजी घेतली आहे. ते मागील दहा वर्षांपासून कार वापरत आहेत. मात्र, त्यांना आजवर कधीही हेल्मेटबाबत विचारणा झाली नाही. आज अचानक वाहतूक विभागाकडून त्यांना दंडाचे छापील चलन घरच्या पत्त्यावर आले. ज्यामध्ये त्यांना हेल्मेट न घालता वाहन चालवल्याचा 500 रुपये दंड आकारण्यात आला आहे. यामुळे ते वाहतूक विभागात चकरा मारत आहेत. मात्र, वाहतूक विभागाकडून त्यांना योग्य प्रतिसाद मिळत नाही.

  • प्रदीप पाटील 26 मे 2019 रोजी कार चालवताना मोबाईल फोनवर बोलत होते. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी त्यांना 200 रुपये दंड लावला. तो त्यांनी त्यांची चूक मान्य करत वाहतूक विभागाला भरला. तो दंड भरताना वाहतूक पोलिसांनी पाटील यांच्यावर अगोदरचा 500 रुपये दंड शिल्लक असल्याची आठवण करून दिली. त्याबाबत त्यांनी अधिक माहिती विचारली असता त्यांनी हेल्मेट न वापरता वाहन चालवले म्हणून दंड लावल्याची धक्कादायक माहिती त्यांना मिळाली.

पाटील यांनी ऑनलाईन याबाबत खात्री केली असता त्यांच्या नावावर हेल्मेट न घातल्याचा दंड लावण्यात आला आहे. त्यासोबत वाहतूक पोलिसांनी एका दुचाकीचा फोटो जोडला आहे. त्या फोटोमध्ये एक महिला मोपेड दुचाकीवरून जात आहे. तिने हेल्मेट घातलेले नाही. त्या दुचाकीचा नंबर एमएच 14 / ईएक्स 4515) असा आहे. हे चलन मोपेड दुचाकीच्या मालकाला पाठ्वण्याऐवजी वाहतूक पोलिसांनी पाटील यांना पाठवले आहे. वाहतूक पोलिसांकडून एमएच 14 ऐवजी एमएच 12 असा बदल झाला आहे. पण, चूक नसताना वेगळ्याच वाहनांचा दंड वेगळ्याच वाहन चालकांकडून वसूल करण्याचा वाहतूक पोलिसांचा हा फंडा पाटील यांच्या अजूनही लक्षात आलेला नाही.

  • त्यानंतर पाटील यांनी निगडी वाहतूक विभागात जाऊन चौकशी केली. तिथून त्यांना वाकड येथे वाहतूक विभागाच्या नियंत्रण कक्षात जाण्यास सांगितले. पाटील वाकड येथील पिंपरी-चिंचवड वाहतूक नियंत्रण कक्षात गेले. तिथल्या अधिका-यांनी त्यांना याबाबत सांगितले की, ‘हे चलन पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाकडून देण्यात आले नाही, तर पुणे वाहतूक विभागाकडून देण्यात आले आहे.’

पुणे पोलिसांनी मागील काही महिन्यांपासून हेल्मेटसक्तीची कठोर कारवाई सुरु केली आहे. वाहतूक पोलिसांनी हेल्मेट सक्तीच्या दंडातून कोट्यवधींची गंगाजळी सरकारी तिजोरीत भरली आहे. हेल्मेट सक्तीपुढे पुणे पोलिसांनी इतर कारवायांकडे सरळ दुर्लक्ष केले. त्यानंतर ही हेल्मेटसक्ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली. मुख्यमंत्र्यांनी देखील ‘वाहनचालकांकडून भर रस्त्यात दंड वसूल करण्यापेक्षा पुराव्यासह वाहनचालकांच्या पत्त्यावर चलन पाठवण्याचा’ पोलिसांना सल्ला दिला. त्यावर पोलिसांनी अंमलबजावणी करत चलन पाठवण्याचा सपाटा सुरू केला. यात त्यांनी एका वाहनाचा दंड दुस-या वाहन चालकांकडून वसूल करण्यासही मागेपुढे बघितले नाही.

प्रदीप पाटील म्हणाले, “प्रशासनाच्या चुकांमुळे नागरिकांना एका कार्यालयातून दुस-या कार्यालयात फे-या माराव्या लागत आहेत. ऑनलाईन चलन येत असेल तर चुका दुरुस्त करून चलन रद्द करण्याची देखील ऑनलाईन व्यवस्था असायला हवी. दंडाची रक्कम भरायची असेल तर ऑनलाईन पर्याय उपलब्ध आहेत. पण, प्रशासनाच्या चुकांमुळे झालेला दंड रद्द करायचा असेल तर मात्र, ऑनलाईन प्रक्रिया नसून केवळ नागरिकांसाठी मनस्ताप आहे. ऑनलाईन पद्धतीने दंड रद्द करण्याची प्रक्रिया असेल तर त्याबाबत वाहतूक पोलिसांकडून मला अजूनही सांगण्यात आले नाही.”

  • वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा जाधव म्हणाल्या, “वाहतूक विभागाच्या नियंत्रण कक्षातून पाटील यांना चलन पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाकडून देण्यात आले नसल्याचे सांगितले आहे. त्यांनी पुणे येथील वाहतूक विभागाच्या कार्यालयात जाऊन चौकशी करावी. पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाकडून असा प्रकार आजवर झालेला नाही. पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाकडून चूक झाली असल्यास त्यांना पूर्ण सहकार्य केले जाईल.”

spot_img
Latest news
Related news