Pune Rural Police: मंचर पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना 20 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज – पुणे ग्रामीण पोलीस दलातील दोन पोलीस शिपायांना 20 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी (दि. 2) करण्यात आली आहे. क्रिकेटची बेटिंग सुरू ठेवण्यासाठी ही लाच घेतली होती.

प्रशांत सुरेश भुजबळ (वय 33), कृष्णदेव सुभाष साबळे (वय 31) अशी अटक केलेल्या पोलीस शिपायांची नावे आहेत. याप्रकरणी 22 वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे.

आरोपी भुजबळ आणि साबळे पुणे ग्रामीण पोलीस दलातील मंचर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तक्रारदार तरुण क्रिकेटच्या मॅचवर बेटिंग घेतो. त्याच्यावर कारवाई न करण्यासाठी आरोपींनी तक्रारदाराकडून 30 सप्टेंबर रोजी 50 हजारांची लाच घेतली. त्यानंतर क्रिकेटवरील बेटिंग पुढे सुरू ठेवण्यासाठी आणखी 50 हजारांची मागणी केली. तडजोडीअंती 20 हजार रुपये देण्याचे ठरले होते.

दरम्यान तक्रारदाराने एसीबीकडे याबाबत तक्रार केली. एसीबीच्या पथकाने सापळा रचून दोन्ही पोलीस शिपायांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. एसीबी पुणे युनिटच्या पोलीस निरीक्षक अलका सरग, सुनील बिले, पोलीस कर्मचारी वैभव गोसावी, रतेश थरकार, गणेश भापकर यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.