Pimpri News :…अन्यथा मनपा भवनावर चढून आंदोलन करू; रयत विद्यार्थी परिषदेचा इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या खाजगी आणि सरकारी जागेवरील जीआयएस पद्धतीने वृक्ष गणनेचे कामकाज दिलेल्या कंपनीला काळ्या यादीत टाकावे, संबंधित ठेकेदाराकडून दंड वसूल करण्यात यावा यासह संबंधित ठेकेदारास पाठिशी घालणा-या अधिका-यांची चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी. अशी मागणी रयत विद्यार्थी परिषदेने केली आहे. अन्यथा 4 ऑक्टोबरला मनपा भवनावर चढून आंदोलन करण्याचा इशारा परिषदेने दिला आहे.

रयत विद्यार्थी परिषदेचे सचिव रविराज काळे यांनी याबाबत पालिका आयुक्त राजेश पाटील यांना ई-मेल द्वारे निवेदन पाठविले आहे. ‘में. टेरेकोन इकोटेक प्रा.लि. या संस्थेने वृक्ष गणनेच्या कामकाजात निष्काळजीपणा दाखवून पालिकेचा पैसा आणि वेळ वाया घालविला आहे. तीन वेळा दंड ठोठावून आणि एक वेळा मुदतवाढ देऊनही दिलेल्या मुदतीत वृक्षगणनेचे कामकाज पूर्ण न झाल्यामुळे या ठेकेदारास कामकाजातील विनाकारण विलंब, अनियमितता यामुळे वृक्ष गणनेचे कामकाज पूर्ण होण्यास मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे.’

‘वृक्षगणना आणि त्यांना जतन करण्यासंदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका कडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याने, 12 ऑगस्ट रोजी उद्यान विभागातील झाडांवर बसून आंदोलन केले. सात दिवसांत ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्दाप कारवाई केली नाही. पालिकेकडून त्यांना पाठीशी घालण्याचे काम केले जात आहे. पिंपळे निलख येथील वृक्ष तोड केली त्यास चार महिने उलटून गेले, तरीही त्यांच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.’ असे या निवेदनात म्हटले आहे.

‘या’ आहेत रयत विद्यार्थी परिषदेच्या प्रमुख मागण्या 

  • में.टेरेकोन इकोटेक प्रा .लि या ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे.
  • संबंधित ठेकेदाराकडून 3 लाख 50 हजार रुपये दंड वसूल करण्यात यावा.
  • संबंधित ठेकेदारास पाठिशी घालणा-या अधिका-यांची चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी.
  • ‘ड’ प्रभागातील ज्यु इंजिनिअर वर्षा कदम यांच्यावर गुन्हा दाखल करावा किंवा 50 हजार दंड ठोठावण्यात यावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.