Pimpri : सराईत आरोपीला अटक; 7 पिस्तुल 15 काडतुसे जप्त

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे कारवाई 


एमपीसी न्यूज – मध्यप्रदेशमधील उमरटी येथून पिस्तूल आणून पिंपरी-चिंचवड शहरात त्याची विक्री    करणा-या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. तसेच त्याच्याकडून बेकायदेशीर पिस्तूल खरेदी करणा-या एकाला देखील अटक करण्यात आली असून दोघांकडून सात देशी बनावटीचे पिस्तूल आणि 15 काडतुसे असा एकूण 1 लाख 97 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

 

अनुप नवनाथ सोनवणे (वय 28, रा. 410 प्रेरणा बिल्डिंग, अंकुशचौक, ओटास्कीम, निगडी. मूळ रा. डोंगर किनी, ता. पाटोदा, जि. बीड) आणि अवधूत जालिंदर गाढवे (वय 26, रा. स्पाईन रोड, मोशी प्राधिकरण. मूळ रा. गाढवे मळा ओतूर, ता. जुन्नर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

 

अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील आदी उपस्थित होते.

 

अपर पोलीस आयुक्त मकरंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनुप सोनवणे याचे डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले आहे. तो लेबर सप्लाय करण्याचे काम करतो. त्याने बेकायदेशीररित्या पिस्तूल विक्रीसाठी आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून त्याला ओटास्कीम भागातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करून त्याच्या निगडी येथील घरातून चार देशी बनावटीचे पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे असा ऐवज जप्त केला. त्यानुसार शस्त्र अधिनियम 1959 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 31ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

पोलीस कोठडीमध्ये असताना अनुप याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याचा मित्र अवधूत गाढवे याला दोन पिस्तूल आणि 11 काडतुसे विकली असल्याचे सांगितले. यावरून गाढवे याला ताब्यात घेतले. गाढवे हा हॉटेल व्यवसाय करतो. त्याच्याकडे कौशल्यपूर्वक चौकशी केली असता त्याने पिस्तूल विक्री केल्याचे मान्य केले. यावरून त्याला अटक करून त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि तीन काडतुसे जप्त करण्यात आली. अन्य आठ काडतुसे त्याने केळगाव येथील नदीकाठी पिस्तूल सरावासाठी फायर केल्याचे कबूल केले. गाढवे याच्यावर दिघी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्यात तो 1 जुलै 2018 पासून फरार आहे.

 

अनुप याच्याकडे आणखी तपास केला असता त्याने त्याच्या खडकी येथील घरात एक पिस्तूल ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी अनुप खडकी येथील घरातून एक पिस्तूल आणि चार काडतुसे जप्त केली. अनुप याने सर्व पिस्तूल व काडतुसे मध्य प्रदेश मधील उमरटी येथून आणले होते. अनुप याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात दोन, खडक, सांगवी आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत.

 

दोन्ही आरोपींकडून एकूण 7 देशी बनावटीचे पिस्तूल 15 जिवंत काडतुसे असा एकूण 1 लाख 97 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली मरळे, पोलीस हवालदार प्रमोद वेताळ, कैलास बाबडे, प्रमोद लांडे, राजेंद्र शेटे, प्रवीण दळे, राजेश परंडवाल, आप्पासाहेब कारकूड, महादेव धनगर, दिलीप लोखंडे, पोलीस नाईक अमित गायकवाड, तानाजी गाडे, सुरेंद्र आढाव, किरण चोरगे, संतोष बर्गे, हेमंत खरात, पोलीस शिपाई प्रदीप गाडे, प्रमोद हिरळकर, स्वप्नील शिंदे, सुनील चौधरी, गोपाल ब्राह्मदे यांच्या पथकाने केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.