Pimple Saudagar News : फ्लॅटमध्ये अडकलेल्या दीड वर्षांच्या मुलीची सुटका; अग्निशमन दलाच्या जवानांचे नागरिकांकडून कौतुक

एमपीसी न्यूज – आतल्या बाजूने कडी लावली गेल्याने आत अडकलेल्या दीड वर्षांच्या ईशान्वी दिपक इंगवले हिची पिंपरी – चिंचवड अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूपपणे सुटका केली. बुधवारी (दि. 1) दुपारी साडेतीन वाजता खुशबू एक्सोटिका, कल्पतरू सोसायटी समोर, क्रांती नगर, पिंपळे सौदागर येथे हे रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले.

दुपारी पिंपरी – चिंचवड अग्निशमन विभागाला पिंपळे सौदागर परिसरातून एक फोन आला. ‘खुशबू एक्सोटिका’ या सोसायटीमध्ये एक लहान मुलगी फ्लॅटमध्ये अडकली असल्याची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. त्यानुसार अग्निशमन दलाचे जवान विशाल फडतरे, बाळासाहेब वैद्य, दिग्विजय नलावडे, कृष्णा राजकर, सिद्धेश दरवेश, अर्जुन वाघमारे, स्मिता गौरकर, धनश्री बागुल, श्वेता गायकवाड आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

ईशान्वी फ्लॅट मधील बेडरूममध्ये दरवाजाची कडी आतून लॉक झाल्याने आत अडकून पडली होती. दरवाजा उघडता येत नसल्याने ती रडत होती. तिचे पालक प्रचंड घाबरले होते. जवानांनी अग्निशमन साहित्याचा उपयोग करून दरवाज्याची कडी तोडून ईशान्वीला सुखरूपपणे बाहेर काढले. घाबरलेल्या अवस्थेतील आपलं बाळ सुखरूप बाहेर काढल्याने मुलीच्या आई-वडिलांनी अग्निशमन दलाचे आभार मानले व त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

शहीद विशाल जाधव यांचा आज द्वितीय शहीद दिवस

1 डिसेंबर 2019 रोजी दापोडी येथील दुर्घटनेत पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलातील शहीद जवान विशाल हनुमंतराव जाधव यांना वीरमरण आले होते. त्यांचा आज द्वितीय शहीद दिवस आहे. याच अनुषंगाने अग्निशमन दलातील जवानांचे कार्य व त्यांच्या शौर्या विषयी स्थानिकांनी कौतुक प्रदान केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.