Sangvi : बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेवावर गुन्हा दाखल!

सासरच्यांनी पत्नी व मुलांना भेटू न दिल्याने युवकाची आत्महत्या; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – पत्नी मुलांना घेऊन माहेरी राहत आहे. त्यामुळे एका लग्न समारंभाच्या निमित्ताने त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या पतीला सासरच्यांनी अपमानास्पद वागणूक दिली. या नैराश्यातून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. 18) सकाळी पावणेआठच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी नववरासह पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

समाधान शिंदे, सचिन शिंदे, दुर्गाबाई शिंदे (सर्व रा. चाकण), महेश लोखंडे, गणेश लोखंडे (रा. पिंपळे गुरव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. विनोद मुत्तांन्ना लोखंडे (वय 27, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सुरेश लोखंडे असे गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश यांची पत्नी छाया लोखंडे त्यांच्या तीन मुलांसह माहेरी राहतात. सुरेश पत्नी आणि मुलांना भेटण्यासाठी सतत प्रयत्न करत होते. आज (रविवारी, दि. 19) गणेश याचा विवाह चाकण येथे होणार आहे. विवाह समारंभासाठी गणेश याच्या घरी सर्व पाहुणे आले. त्यामध्ये सुरेश यांची पत्नी आणि मुलेही आले होते. पत्नी व मुलांना भेटण्यासाठी सुरेश बुधवारी (दि. 15) गणेश याच्या घरी गेले. पत्नी छाया हिने सुरेश यांना त्यांच्या मुलांना भेटू दिले नाही. तसेच सर्व आरोपींनी सुरेश यांना मारहाण केली.

‘आमच्या घरी लग्न आहे. तुमच्यामुळे लग्न कार्यात अडथळा नको. लग्नानंतर आम्ही तुम्हाला बघून घेऊ’ अशी आरोपींनी सुरेश यांना धमकी दिली. सुरेश यांनी ‘आपण आपले भांडण घरात बसून मिटवू, पाहुण्यांसमोर गोंधळ नको’ असे सांगितले. त्यावर ‘तू तिकडे मरून जा, आमच्या लग्नात येऊ नको आणि मुलांनाही भेटू नको’ असे आरोपींनी सुरेश यांना म्हटले.

  • या नैराश्यातून सुरेश यांनी राहत्या घरात नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. गणेश याच्यावर लग्नाच्या आदल्या दिवशी गुन्हा दाखल झाला. बोहल्यावर चढण्यापूर्वीच पोलीस ठाण्याची पायरी चढण्याची वेळ गणेश आणि त्याच्या कुटुंबियांवर आली आहे. सांगवी पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.