PCMC News : हाय व्हॅक्यूम सक्शन मशीन खरेदीत  घोटाळा; ठेकेदाराला काळ्या यादीत टाका – लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या हाय व्हॅक्यूम सक्शन मशीन खरेदीत गडबड घोटाळा झाल्याचा आरोप करत ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

आमदार जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे, “महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने रुग्णालयांसाठी 20 हाय व्हॅक्यूम सक्शन मशीन खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबवली.त्यानंतर सेबर्ड सिस्टम्स आयएनसी या पुरवठादार ठेकेदाराला कामाचा आदेश दिला आहे.त्यानुसार संबंधित पुरवठादार ठेकेदाराने वैद्यकीय विभागाला मशीन पुरवल्या आहेत. मूळात या मशीन खरेदीची निविदाच म्हणजे एक प्रकारचा गडबड घोटाळा आहे. निविदा प्रक्रियेमध्ये निश्चित केलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन करून या पुरवठादार ठेकेदाराला पात्र केले आहे.

निविदेत मशीनमध्ये कोणत्या टेक्निकल स्पेसिफिकेशन असावेत हे नमूद आहे.त्यानुसार पुरवठादार ठेकेदाराने वैद्यकीय विभागाला मशीन देणे कायद्याने बंधनकारक आहे. प्रत्यक्षात पुरवठादार ठेकेदाराने वैद्यकीय विभागाला दिलेल्या मशीन निविदेत नमूद टेक्निकल स्पेसिफिकेशनच्या नसल्याचे समोर आले आहे. घोटाळा करण्याच्या उद्देशाने निविदा प्रक्रिया राबवलेल्या अधिकाऱ्यांनी निविदेत नमूद टेक्निकल स्पेसिफिकेशन नसलेल्या मशीन पुरवठादार ठेकेदाराकडून दाखल करून घेतल्या आहेत. निविदेत एका मशीनची किंमत सुमारे 6 लाख 80 हजार नमूद असून, सरकारच्या जीईएम पोर्टलवर याच मशीनची किंमत 3 ते 4 लाखांच्या घरात आहे.

पुरवठादार ठेकेदाराने वैद्यकीय विभागाला दिलेल्या मशीनमध्ये निविदेत नमूद तब्बल 14 हून अधिक टेक्निकल स्पेसिफिकेशन नसल्याची बाब समोर आली आहे.मशीनमध्ये चुकीचे ऑपरेटिंग सिस्टिम, चुकीचा एअर फ्लो, व्हायरस फिल्टर नसणे, उच्चतम आवाज पातळी, मशीनमध्ये मेंब्रेन प्रणाली नसणे, इलेक्ट्रिक शॉक न लागण्याची प्रणाली नसणे, सॉलिडिफायडर नसणे यांसह अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी मला प्राप्त झाल्या आहेत. या मशीन वापरात आणल्यास उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्या मशीन हाताळणाऱ्या वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला व जिवाला धोका होऊन मोठी दुर्घटना नाकारता येत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.