Bhosari Crime News : समोर नाचताहेत म्हणून दोन युवकांना जीवे मारण्याचा प्रयत्न ; 21 जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – उद्घाटन कार्यक्रमात समोर नाचत आहे म्हणून, दोन युवकांना कोयत्याने वार करुन व डोक्यात सिमेंटचा गट्टू मारुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी 21 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सात जणांना अटक केली आहे. एसीपी कॅफे, दिघी रोड, भोसरी येथे शनिवारी (दि.02) ही घटना घडली.

याप्रकरणी गोपाळ कुंडलीक मकेश्वर (वय 51, वडगाव रोड, देवाची आळंदी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून तब्बल 21 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी सात जणांना अटक केली आहे. तेजस गालफाडे, प्रकाश काळे, राकेश काळे, आकाश भेंडेकर, मयुर पाटोळे, ओमकार पाटोळे, प्रसाद कोल्हे (रा. दिघी रोड, भोसरी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रसाद कोल्हे याने कोणतीही परवानगी न घेता लाईट, साऊंड यांची व्यवस्था करुन उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला फिर्यादी गोपाळ यांचा मुलगा प्रज्वल मकेश्वर (वय 19) आणि त्याचा मित्र ओमकार गाडेकर (वय 18) गेले होते. त्यावेळी ‘हे लयच माजलेत, आपल्या समोर नाचतात काय त्यांना माहीत नाही का, मी आळंदीचा भाई आहे. यांना दाखवा रे आपला दम,’ असे एका आरोपीने इतर आरोपींना सांगितले.

तीन आरोपींनी प्रज्वलच्या डोक्यात तलवारीने वार केले तसेच, ओमकार गाडेकर याला सिमेंटच्या गट्टू मारला व दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ‘यांना जिवंत सोडू नका, कापून टाका,’ अशी धमकी आरोपीने दिली असे फिर्यादीत नमूद केले आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.