Talegaon News : टोल भरण्याच्या कारणावरून शिफ्ट इनचार्जला बेदम मारहाण

सहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – टोल भरण्याच्या कारणावरून सहा जणांच्या टोळक्याने सोमाटणे फाटा येथील टोलनाक्यावर शिफ्ट इनचार्ज म्हणून काम करणा-या व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 14) दुपारी पावणे दोन वाजता घडली.

यशराज शिवराम हाके, शिवराम निवृत्तीराव हाके, उमेदसिंग दुर्गासिंग राजपूत, दीपक हरिलाल विश्वकर्मा, गुरुपित सुखविंदर सिंग, सिद्धार्थ शिवाजी ढाकणे अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. याबाबत शैलेंद्र भगवान शिशोदे (वय 35, रा. सोमाटणे टोल नाका, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिशोदे जुना पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोल नाक्यावर शिप इनचार्ज पदावर काम करतात. गुरुवारी दुपारी पावणे दोन वाजता टोल नाक्यावर एम एच 14 / सी सी 2226 आणि एम एच 12 / एल डी 1445 या दोन कार आल्या. कारमधील आरोपींनी टोल भरण्याच्या कारणावरून शिशोदे यांना शिवीगाळ, दमदाटी करून हाताने, लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यात शिशोदे जखमी झाले आहेत. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.