Shirur Corona News : ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्या – डॉ.अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज – कोविड 19 विषाणूंची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शिरुर तालुक्यातील आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाची श्रेणीवाढ करुन उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा करण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

कोविडच्या दुसऱ्या लाटेचा शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यापासून व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. शिरुर तालुक्यात ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची संख्या पुरेशा प्रमाणात नसल्याने रुग्णांना पुणे शहरातील रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत आहे.

त्यामुळे शिरूर तालुक्यात चांगल्या दर्जाची व सक्षम आरोग्य सेवा निर्माण होणे आवश्यक आहे, याकडे खासदार डॉ. कोल्हे यांनी आरोग्यमंत्री टोपे यांना पाठविलेल्या पत्रात लक्ष वेधले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांनी वर्तवली आहे. सध्याच्या परिस्थितीत आरोग्य यंत्रणेवर आलेला ताण पाहता तिसरी लाट येण्यापूर्वीच ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन प्लांट या सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

त्यामुळे शिरूर ग्रामीण रुग्णालयाची श्रेणीवाढ करुन उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन ऑक्सिजन व व्हेंटिलेटर सुविधा असणारी 50 बेडची व्यवस्था करण्याची मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी केली आहे.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले,  ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सक्षम व पुरेशा प्रमाणात असणं आवश्यक होतं. मात्र आजवर आरोग्यसेवेकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. त्यामुळेच कोविडच्या संकटाशी सामना करताना एकूणच यंत्रणेवर खूप मोठा ताण आला आहे. त्यामुळे या पुढील काळात अशा प्रकारचे आजार आल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी ग्रामीण भागात सुसज्ज रुग्णालयांची गरज आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी सुसज्ज मल्टिस्पेश्यालिटी रुग्णालये उभी राहावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.