Pune News : किरीट सोमय्यांना शर्टाने मारहाण करणारा ‘तो’ शिवसैनिक गजाआड

एमपीसी न्यूज – भाजप नेते किरीट सोमय्या शनिवारी सायंकाळी पुणे महानगरपालिकेत येताच शिवसैनिकांकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. या झटापटीत किरीट सोमय्या खाली कोसळले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. दरम्यान, सोमय्या यांना शर्ट काढून शर्टाने मारणाऱ्या शिवसैनिकाला अखेर अटक करण्यात आली.

पुणे पोलिसांनी या प्रकरणी शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांच्यासह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल केला, मात्र गुन्हा दाखल होऊन चोवीस तास उलटून गेले तरीही अद्याप आरोपींना पकडण्यात आलेले नाही. आरोपी अद्याप सापडले नसून त्यांना पकडण्यासाठी पुणे पोलिसांची दोन पथके त्यांच्या मागावर असल्याचे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले. सनी गवते असे अटक करण्यात आलेल्या शिवसैनिकाचे नाव आहे.

किरीट सोमय्या यांना जेव्हा पुणे महापालिकेत धक्काबुक्की करण्यात आली तेव्हा सनी गवते हा आघाडीवर होता. किरीट सोमय्या पायर्‍यांवरुन खाली घसरले, तरीही सनी गवते यांनी पुढे येत स्वतःच्या अंगातील शर्ट काढून त्या शर्टने सोमय्या यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये दिसून आला. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी गवते यांना अटक केली असून कोर्टात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.