Sports Day : खेळाडूंवर अन्याय होणार नाही यासाठी पिंपरी चिंचवडला जिल्ह्याचा दर्जा द्यावा – प्रशांत शितोळे

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड शहराचे क्रीडा क्षेत्रातही मोठे योगदान असताना केवळ जिल्ह्याचा दर्जा नसल्याने क्रीडा क्षेत्रात पाहिजे तेवढा विकास होत नाही, शासनाने पिंपरी चिंचवड शहराला जिल्ह्याचा दर्जा द्यावा जेणे करून या शहरातील खेळाडूंवर अन्याय होणार नाही अशी मागणी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉग्रेसचे कार्य़ाध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी पिंपरी (Sports Day) येथे केली.

ते पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने, कै. भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठान व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कबड्डी पंच शिबीराच्या समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या उपाध्यक्षा शकुंतला खटावकर, सदस्य बाबुराव चांदेरे, राज्य पंच मंडळाचे अध्यक्ष विश्वास मोरे, सचिव आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच दत्ता झिंजुर्डे, सूर्य़ंकात देसाई, अजित पाटील, सुहास पाटील, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्य़ाध्यक्षा वासंती बोर्डे सातव, उपाध्यक्ष संजोग वाघेरे, सरकार्य़वाह राजेंद्र आदेंकर, योगेश यादव, पंच मंडळाचे अध्यक्ष संदीप पायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहराला जिल्ह्याचा दर्जा नसल्याने विशेषत: कबड्डीमध्ये खेळाडूंवर अन्याय होत असल्याची भावना येथील खेळाडूंच्या मनात निर्माण होत आहे. पुणे शहरासह, ग्रामीण भाग व पिंपरी चिंचवड मिळून एकच जिल्हा आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पुणे शहरासह पुणे ग्रामीण व पिंपरी चिंचवड असे तीन जिल्हे करावेत जेणे करून राज्यस्तरीय स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंना सहभागी होता येईल अशी मागणी शितोळे यांनी केली आहे.

Balbharti : बालभारती ग्रंथालय वाचकांना खुले

संघात जागा कमी असल्याने पिंपरी चिंचवडच्या (Sports Day) खेळाडूंवर अन्याय होत असल्याची भावना येथील खेळाडू व संघटकांमध्ये निर्माण होत आहे. पिंपरी चिंचवड शहराचा क्रीडा क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात विकास झाला आहे. मात्र, खेळाच्या दृष्टीने शासनाने जिल्ह्याचा दर्जा दिलेला नसल्याने खेळांडूंना अपेक्षित सोयी सुविधा मिळत नाहीत. ते म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहराचा नुसता इंफ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने विकास न करता शारिरीक आणि बौद्धिक विकाससुद्धा होणे गरजेचे आहे. आणि यासाठी पिंपरी चिंचवड पालिकेने जबाबदारी उचलणे गरजेचे आहे.

यातून पिंपरी चिंचवडचा नावलौंकीक वाढण्यास मदत होणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात कबड्डीचे राज्यस्तरीय कबड्डी पंच शिबीराचे आयोजन करून चांगले पंच निर्माण करण्यासाठी उचलले एक महत्त्वाचे पाऊल असून कबड्डी पंचांनी दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी असे उपस्थित पंचाना केले. माणूस आहे तो चुकणार! मात्र, त्यासाठी निपक्षपातीपणे निर्णय द्यावेत, जेणेकरून खेळाचा विकास होईल. कार्य़क्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र आंदेकर यांनी केले, तर आभार दत्ता झिंजुर्डे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.