Pune : पंक्चर झालेल्या एसटीला ट्रकची धडक ; एसटीचा चालक आणि वाहक ठार

पाच प्रवासीही जखमी

एमपीसी न्यूज- टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या एसटीला भरधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिली. यामध्ये एसटी चालक आणि वाहकाचा मृत्यू झाला. तर, पाच प्रवासीही जखमी झाले आहेत. मंगळवारी (दि. 14) पहाटे साडेपाचच्या सुमारास मुंबई- बंगळूर महामार्गावर पाषाण येथे हा अपघात झाला.

चालक मोहन उत्तमराव बांदल (वय 55, रा. महुडे, ता.भोर) आणि वाहक शंकर चंद्रकांत चव्हाण अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अभिजित मोहन बांदल (वय 25) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रकचालक राजीव सुंदरम गांधी (वय 36, रा. उलुंडरपेट, जि. विल्लपुरम, तामिळनाडू) यास अटक करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मोहन बांदल हे एसटी चालक होते. ते मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुंबईवरून भोरच्या दिशेने एसटी येत होते. दरम्यान, पाषाण येथे टायर पंक्चर झाल्याने त्यांनी एसटी रस्त्याच्या बाजूला थांबवली. ते खाली उतरून पाहणी करत होते.

पंक्चर काढण्यास वेळ लागणार असल्याने एसटीतील काही प्रवासी देखील खाली उतरले. त्यावेळी आरोपी गांधी चालवत असलेल्या ट्रकने पाठीमागून येऊन एसटीला जोरदार धडक दिली. यामध्ये बांदल आणि चव्हाण यांच्यासह काही प्रवासी जखमी झाले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, बांदल यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तसेच, चव्हाण यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. जखमी प्रवाशांवर प्रथमोपचार करून त्यांना इतरत्र हलवण्यात आले आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.