Pimpri News : भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश मीडिया प्रमुखपदी सुजाता पालांडे

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवडमधील संत तुकारामनगरच्या माजी नगरसेविका सुजाता पालांडे यांची भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महिला प्रदेशाध्यक्षा तथा विधान परिषदेच्या सदस्या आमदार उमा खापरे यांनी पालांडे यांना याबाबतचे नियुक्तीपत्र दिले आहे. पालांडे यांच्या गेल्या दहा वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय कार्यकिर्दीची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर प्रदेश पातळीवर काम करण्याची जबाबदारी सोपविली आहे.

 

पिंपरी विधानसभा मतदार संघातील संत तुकारामनगर प्रभागाच्या माजी नगरसेविका सुजाता पालांडे यांचे शिक्षण मुंबईत पूर्ण झाले. त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतलेली आहे. महिला गणेश मंडळ, महिला बचत गट, महिलांची दही हंडी अशा धार्मिक आणि सांस्कृतीक क्षेत्रात त्यांना विद्यार्थीदशेपासूनच आवड आहे. उच्चशिक्षित असल्यामुळे त्यांच्यामध्ये बाणेदार संघटनकौशल्य आहे. विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी ‘चूल आणि मूल’ एवढ्यापुरते मर्यादीत राहिलेल्या महिलांना मुख्य प्रवाहात आणले. त्यांना प्रोत्साहन देऊन स्वावलंबी होण्यासाठी शक्य तेवढी मदत केली. त्यांच्यामुळे संत तुकारामनगरमधील शेकडो महिला या बचत गटाच्या माध्यमातून स्वावलंबी बनल्या आहेत. अशा विधायक कार्यामध्ये सुजाताताई पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आघाडीवर राहिल्या आहेत.

 

महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी हक्काचे नेतृत्व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत गेले पाहिजे, या उदात्त हेतुने संत तुकारामनगरमधील महिलांनी त्यांना 2012 ला नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून दिले. निवडून आल्यानंतर त्यांनी सामाजाशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही. त्यांनी पाच वर्ष जनतेसाठी अविरत काम केले. त्यांच्या पारदर्शक कार्याची किमया पाहून 2017 च्या निवडणुकीत पुन्हा संत तुकारामनगरमधील मतदारांनी त्यांना दुस-यांदा भरघोस मतांनी निवडून दिले. भाजपाच्या विधानपरिषद सदस्या आमदार उमाताई खापरे यांच्यासोबत पालांडे यांनी काम केले आहे. त्यांच्यातील सामाजिक चळवळीचे नेतृत्व पाहून पालांडे यांची भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रमुख पदी नियुक्ती केली आहे. भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा तथा आमदार उमाताई खापरे यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.