Talegaon Dabhade: ‘वाईन शॉप’ बंद ठेवणे शक्य नसेल तर ग्राहकांना ‘होम डिलिव्हरी’ द्यावी – वैशाली दाभाडे

एमपीसी न्यूज –  दारू ही अत्यावश्यक गोष्ट नाही, असे मी व्यक्तिशः मानते, प्रशासनाच्या परवानगीने वाईन शॉप पुन्हा खुली करण्यात आली आहेत. तळेगाव दाभाडे व तळेगाव स्टेशन या दोन्ही भागातील वाईन शॉप रहिवासी क्षेत्रामध्ये आहेत. सोमवार (दि 4) पासून दारू खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीमुळे सुरक्षित अंतराचे बारा वाजलेले पहायला मिळत आहे. तरी आपण या प्रकरणी लक्ष घालून सूचना कराव्यात, अन्यथा आपण गेली दीड महिना घेतलेल्या प्रयत्नांवर पाणी फिरेल, असा इशारा उपनगराध्यक्ष वैशाली दाभाडे यांनी दिला आहे. वाईन शॉप बंद ठेवणे शक्य नसेल तर दारुची ‘होम डिलीव्हरी’ करावी, अशी सूचना त्यांनी केली आहे.

यासंदर्भात उपनगराध्यक्ष वैशाली दाभाडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे व तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांना निवेदन दिले. त्यावेळी तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा सुनीता काळोखे, उपाध्यक्षा ज्योती शिंदे, तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्षा निशा पवार, नगरसेविका मंगल भेगडे, संगीता शेळके, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय काळोखे आदी उपस्थित होते.

स्टेशन व गाव दोन्ही बाजारपेठांमध्ये पोलिसांनी गस्त घालावी व वेळ पडल्यास कठोर कारवाई करावी, अशी विनंती वैशाली दाभाडे यांनी केली आहे. सर्व प्रकारचे व्यवसाय चालू करत असताना ते टप्याटप्याने चालू करावेत तसेच त्यांना वेळ मर्यादा आखून द्याव्यात, असे निवेदनात म्हटले आहे. वाईन शाॅप रहिवासी झोनमध्ये येत आहेत. तेथील परिसरात वाहतुकीची  खूप कोंडी होत आहे. दारु खरेदीसाठी येणारी मंडळी त्यांची वाहने रस्त्यावरच बेशिस्तपणे उभी करत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. सुरक्षित शारीरिक अंतर पाळले जात नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका बळावला आहे दोन-तीन तास ही मंडळी रांगेत उभी असतात. त्याचा रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या महिलांना खूप त्रास होतो, याकडेही दाभाडे यांनी लक्ष वेधले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.