Pune : राज्य सरकारच्या नाकर्तेपणापायी पुण्यात कोरोनाची स्थिती गंभीर – जगदीश मुळीक

एमपीसी न्यूज : राज्य सरकारच्या नाकर्तेपणापायी पुण्यात कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर असताना राज्य सरकारने पुण्याला अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे. गेल्या दीड महिन्यात पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात येऊन केवळ दोन बैठका घेतल्या आहेत. अधिकाऱ्यांना ते निर्देश देत असतील याची सुतराम शक्यता नाही. अन्यथा अधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशांमध्ये एकवाक्यता दिसली असती, असे मुळीक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पुण्यातील कोरोना संसर्गाची स्थिती आटोक्यात आणण्यासाठी सात आयएएस अधिकारी नियुक्त आहेत. परंतु, त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित नाहीत. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले यांची बदली करण्यात आली आणि तिथे पूर्णवेळ अधिष्ठाता नियुक्तच केलेला नाही. बदलीनंतर ससूनमधील स्थितीत कोणताही चांगला बदल झालेला नसून ती अधिकच गंभीर होत आहे असेही या निवेदनात म्हटले आहे.

राज्य सरकारने बांधकाम मजुरांना जाहीर केलेले अर्थसहाय्य अजून मिळालेले नाही. रेशनिंग दुकानांमध्ये धान्य मिळत नाही. वितरणात अद्यापही गोंधळ आहे. दारूची दुकाने खुली केल्याने गर्दी झाली त्यामुळे साथीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे, अशी टीका मुळीक यांनी केली असून पुणेकरांच्या हितासाठी प्रशासकीय समन्वय आणि राजकीय इच्छाशक्तीची गरज असल्याचे मुळीक यांनी निवेदनात नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.