Talegaon Dabhade : किशोर भेगडे यांच्या प्रचारातील सहभागाने वाढले शेळके यांचे बळ

एमपीसी न्यूज- मावळची उमेदवारी जाहीर झाल्यापासून काहीसे नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे काल, शुक्रवारी मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या प्रचारात सक्रिय सहभागी झाल्याने शेळके यांचे बळ अधिकच वाढले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर सभेत किशोर भेगडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह हजेरी लावली. एवढेच नाही तर घणाघाती भाषण करीत सभा देखील गाजवली.

मावळातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी तीव्र इच्छुक असलेले किशोर भेगडे उमेदवारी न मिळाल्याने काहीसे नाराज होते. शेळके यांच्या प्रचारापासून ते अलिप्त राहिल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा होती. त्याला किशोर भेगडे यांनी पूर्णविराम दिला.

मावळ तालुक्यात शासनाचा कुठलाही निधी न वापरता सुनील शेळके यांनी स्वतःच्या खर्चाने अनेक विकसकामे केली, असे गौरवोद्गार किशोर भेगडे यांनी काढले. त्यांनी सत्ताधारी आमदारांना दुर्योधनाची उपमा दिली. सत्तेचा वापर जनकल्याणासाठी न करता केवळ स्वार्थासाठी करतो, त्याला दुर्योधन म्हणतात. भाजपची गेली 25 वर्षे मावळात सत्ता असूनही त्यांना जनतेचा विकास करता आला नाही. या उलट सुनीलआण्णा कसलीही सत्ता नसताना स्वतःच्या खर्चाने लोकांच्या हिताची कामे करतोय, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मावळमध्ये अनेक कंपन्या आल्या पण त्यामध्ये यांना स्थानिकांना रोजगार देता नाही. आला त्यांच्यावर अन्याय झाला आणि अन्याय करणारा दुर्योधन असतो. तळेगाव-चाकण रस्त्यांवर आतापर्यंत 100 बळी जाऊनही यांना जाग आली नाही चौपदरीकरणाचे काम अजूनही केले नाही. मावळ तालुक्यात अनेक धरण असून अजूनही दुर्गम भागातील महिलांना पाण्यासाठी दोन दोन किलोमीटरची पायपीट करावी लागते तुम्ही त्यांना प्यायला पाणी देऊ शकत नाही तुम्ही दुर्योधन आहात, अशी जोरदार टीका किशोर भेगडे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.