Talegaon Dabhade : शिवजयंती ते भीमजयंती महोत्सव आयोजनाचे काम पूर्णत्वाकडे

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून राबविण्यात येणा-या शिवजयंती ते भीमजयंती महोत्सव आयोजनाचे काम पूर्णत्वाकडे जात असल्याची माहिती तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण समिती सभापती गणेश खांडगे व सदस्य सुरेश दाभाडे यांनी दिली.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या शिक्षण समितीच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत खांडगे बोलत होते. ते म्हणाले नेहमीप्रमाणे 19 फेब्रुवारीला शिवजयंती, 11 एप्रिलला महात्मा फुले जयंती, तर 14 एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती येत आहे. या सर्व महापुरुषांच्या जयंत्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये होत आहे. यासाठी शिवजयंती पासून या महाउत्सवाला सुरुवात करून डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला याचा समारोप करावयाचा आहे.

या महाउत्सवाच्या कालावधीमध्ये आरोग्य शिबिरे, महिलासाठी प्रशिक्षण वर्ग, व्यवसाय मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासण्या, क्रीडा स्पर्धा आदि समाजउपयोगी उपक्रम तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या शिक्षण समिती, आरोग्य समिती, महिला बालकल्याण समितींच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत.  सर्वधर्म समभाव व जातीय सलोखा निर्माण व्हावा हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.

19 फेब्रुवारी रोजी होणा-या शिवजयंतीसाठी प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालये,अनेक संस्था मधून छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या कार्याचा गौरव करणारे अनेक चित्ररथ तयार करण्यात येणार आहे. यामधून समाज प्रबोधनाचे कार्य साध्य होईल. या महाउत्सवाच्या उपक्रमात सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी सहभागी व्हावे. व भारतीय एकात्मतेचे दर्शन घडवावे असे आवाहन खांडगे व दाभाडे यांनी यावेळी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.