Talegaon Dabhade: स्तुत्य निर्णय ! मिरवणुकीला फाटा, वर्गणीही नाही; गणेशोत्सवासंबंधी तळेगाव स्टेशन येथे नियमावली

या बैठकीत तळेगाव स्टेशन भागात कुठल्याही प्रकारचा सार्वजनिक दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला.

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तळेगाव स्टेशन येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अवांतर खर्चाला फाटा देत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव काळातील देखावा व विसर्जन मिरवणूकही रद्द करण्यात येणार आहे. तसेच मंडळांनी समाजोपयोगी उपक्रमावर भर द्यावा, नागरिक व व्यापा-यांकडून वर्गणी न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर गणेश मुर्तीची उंची ही 3 ते 4 फुटांपर्यंतच ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.

तळेगाव येथील श्री हनुमान मंदिर येथे स्टेशन भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक सोमवारी (दि. 27) सायंकाळी पार पडली. या बैठकीत गणेशोत्सवासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

या बैठकीत तळेगाव स्टेशन भागात कुठल्याही प्रकारचा सार्वजनिक दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला.

गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात आचारसंहिता निश्चित करण्यात आली. तसेच दहीहंडी उत्सवासंदर्भातील नियमावली जाहीर करण्यात आली. यावेळी सर्व सभासदांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे तळेगाव स्टेशन भागातील रहिवासी सोसायटींमधील पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते. ही नियमावली रहिवासी सोसायट्यांना सुद्धा लागू होईल.

गणेशोत्सवासाठीची आचारसंहिता पुढीलप्रमाणे-

– तळेगाव स्टेशन भागात कुठल्याही प्रकारचा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार नाही.

– गणेशोत्सवातील मंडपाचा आकार दहा बाय पंधरा राहील.

– गणेशोत्सव मंडळांना मंदिर, समाज मंदिर किंवा बुद्ध विहार उपलब्ध आहेत अशांनी मंडप न उभारता गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी.

– मंडळांनी कोणतेही आमंत्रित पाहुणे न बोलवता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना आरतीचा मान द्यावा.

– मंडळांनी समाजोपयोगी कार्यक्रम राबवावेत.

– मंडळांनी कमी लोकांमध्ये आरती करावी.

– गणेश मुर्ती तीन ते चार फुटांपर्यंत घ्यावी.

– गणेशोत्सव काळातील आगमन सोहळा व विसर्जन मिरवणूक सोहळा रद्द करण्यात येणार आहे.

– मंडळांनी कोणत्याही सामान्य नागरिकांकडून व व्यापाऱ्यांकडून वर्गणी गोळा करू नये.

बैठकीमध्ये गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी वर्गणी न घेण्याचा निर्णय घेऊन वेगळा पायंडा पाडून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करणार असल्याने तळेगावकर नागरिकांसाठी नव्हे तर मावळवासियांसाठी स्वागतार्ह निर्णय आहे. त्याचबरोबर इतरांनी या गोष्टीचे अनुकरण करावे अशी समाजात चर्चा सुरू आहे. या निमित्ताने नागरिकांनी या निर्णयाचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे.

या बैठकीस उद्योजक किशोर आवारे, ज्येष्ठ नगरसेवक गणेश खांडगे, नगरसेवक निखील भगत, संतोष शिंदे, सुनील पवार, कल्पेश भगत, सुनील कारंडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.