Mumbai News : ‘मातोश्री’ बाहेर पहारा देणाऱ्या 80 वर्षीय आजींची मुख्यमंत्र्यांनी घेतली कुटुंबीयांसह भेट

एमपीसी न्यूज – राणा दाम्पत्याने ‘मातोश्री’ बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केल्यानंतर शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर ठिय्या मांडला. त्यात शनिवारी (दि. 23) 80 वर्षीय आजींनी देखील पहारा दिला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण कुटुंबीयांसह पहारा देणाऱ्या आजींची भेट घेतली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांनी 80 वर्षीय आजी चंद्रभागा शिंदे यांची त्यांच्या शिवडी येथील घरी जाऊन भेट घेतली. मातोश्री बाहेर शिवसैनिकांनी दोन दिवसांपासून ठिय्या मांडला आहे. त्यातच आजी चंद्रभागा शिंदे यांनी देखील शनिवारी हजेरी लावली. त्यांचा उत्साह तरुणाईला देखील लाजवणारा होता.

या शिवसैनिकाचे कौतुक करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी थेट आजींचे घर गाठले. आजींची भेट घेऊन त्यांची विचारपूस करत त्यांचे आशीर्वाद देखील मुख्यमंत्र्यांनी घेतले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “व्यक्ती वयाने मोठी होत असते. ती मनाने मोठी असली पाहिजे. आजींसमोर मी नतमस्तक व्हायला आलो. हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. शिवसैनिक झुकनेवाले नाहीत. आजी मनाने युवासेनेच्या कार्यकर्त्या आहेत.”

आजींचे आभार मानून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना मातोश्रीवर येण्याचे आमंत्रण दिले. आजींचा सत्कार करून कुटुंबीयांची भेट घेऊन मुख्यमंत्री परतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.