Alandi : कार बाजूला घेण्यास सांगितल्यावरून पेट्रोलचा टँकर पेटवून देण्याची धमकी

एमपीसी न्यूज – वाहतुकीस अडथळा करण्याच्या उद्देशाने एकाने रस्त्याच्या मधोमध कार उभी केली. पेट्रोल-डिझेलची वाहतूक करणा-या टँकरवरील चालकाने रस्त्यावरील कार बाजूला घेण्यास सांगितली. यावरून चिढलेल्या दोघांनी चालकाला मारहाण करत टँकर पेटवून देण्याची धमकी दिली.

धनंजय ज्ञानेश्वर पडघमकार (वय 30, रा. अवसरी खुर्द, ता. आंबेगाव) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शंकर बाळू पाचपुते (रा. मरकळ, ता. खेड) आणि अन्य एकजण असे दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय पेट्रोल डिझेल टँकरवर (एम एच 14 / सीपी 9919) चालक म्हणून काम करतात. बुधवारी सकाळी अकराच्या दरम्यान ते लोणी काळभोर येथील कंपनीमधून पेट्रोल डिझेल घेऊन मंचर येथे जात होते. ते मरकळ येथे आले असता, त्यांना एक कार (एम एच 01 / ए एक्स 5315) रस्त्यावर उभी होती.

या कारमुळे वाहतुकीस अडथळा होत होता. त्यामुळे धनंजय यांनी कार रस्त्याच्या बाजूला घेण्यास सांगितले. यावरून दोघांनी मिळून शिवीगाळ आणि दमदाटी करत मारहाण केली. ही गाडी इथेच थांबणार असून तू दुस-या मार्गाने जा, असा दम दिला आणि टँकर पेटवून देण्याची धमकी दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.