Pimpri News : विवेकाचा आवाज क्षीण होता कामा नये ” : भारत सासणे

एमपीसी न्यूज : उदगीर(लातूर) येथे येत्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या नियोजित आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांचा यथोचित सन्मान महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या वतीने अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, पुणे विभाग प्रमुख कवी राजेंद्र वाघ आणि पिंपरी चिंचवड शहर विभागप्रमुख सुरेश कंक यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे येथे  शाल, स्मृतिचिन्ह अन पुस्तक भेट देऊन केला.

याप्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी,विद्याधर अनास्कर, भारती विद्यापीठाचे कुलपती शिवाजीराव कदम,प्रकाश पायगुडे,राजीव बर्वे, माधव राजगुरू, श्रीकांत चौगुले हे मान्यवर उपस्थित होते.

भारत सासणे म्हणाले, ‘आजचा काळ संमिश्र स्थितीचा आहे. माझ्या कथाही संमिश्रच असतात. व्यापक जीवन उलगडून कथा लिहाव्या लागतात. उत्तम प्रकारचे साहित्य समजून घ्यावे लागते. विवेकाचा आवाज क्षीण झाला आहे तो होता कामा नये. आत्मनिर्भर होऊन सत्य सांगता आले पाहिजे. लेखकांनी जाणीवपूर्वक यावर लिहिले पाहिजे. साहित्यिक संस्था सध्याच्या काळात अडचणीत आहेत. त्यांच्या अडचणी सोडविण्याचा सातत्याने मी प्रयत्न करणार आहे.

कविवर्य नारायण सुर्वे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेने केलेला सन्मान मनाला भावला आहे.’ प्रकाश पायगुडे यांनी प्रास्तविक केले. राजीव बर्वे यांनी मनोगत व्यक्त केले.

मिलिंद जोशी म्हणाले, ‘आजच्या समाजाला दिशा देण्याचे काम संमेलनाध्यक्षकांनी करावे.’ पदमश्री सिंधुताई सपकाळ यांना भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली.सूत्रसंचालन कवी उद्धव कानडे यांनी केले तर आभार महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्ष सुमित्राराजे पवार यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.