PCMC News : अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजाची पुन्हा अदलाबदल! प्रदीप जांभळे यांच्याकडे सर्वाधिक विभाग

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC News) प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांनी केवळ तीन महिन्यात पुन्हा अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजाचे नव्याने वाटप केले आहे. अतिरिक्त आयुक्त एक प्रदिप जांभळे यांच्या पदाचा वाद महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट) मध्ये प्रलंबित असताना त्यांच्याकडे बांधकाम परवानगीसह ‘क्रीम’ खाती देत सर्वाधिक 16 विभागांची जबाबदारी सोपविली आहे. जितेंद्र वाघ यांच्याकडे 14 तर उल्हास जगताप यांच्याकडे 12 विभाग देण्यात आले आहेत.

महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश झाल्यामुळे तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे आहेत. प्रतिनियुक्तीवरील दोन आणि स्थानिक एक अशी विभागणी आहे. सध्या प्रतिनियुक्तीवरील प्रदिप जांभळे, जितेंद्र वाघ आणि स्थानिक अधिका-यांमधून उल्हास जगताप असे तीन अतिरिक्त आयुक्त आहेत. आयुक्त शेखर सिंह यांनी या तीनही अतिरिक्त आयुक्तांना 26 सप्टेंबर 2022 रोजी विभागांचे वाटप केले होते. आता पुन्हा आयुक्तांनी केवळ तीन महिन्यात अतिरिक्त आयुक्तांच्या विभागांचे मंगळवारी (दि.10) फेरवाटप केले आहे. लेखा, अमृत, स्मार्ट सिटी, जेएनएनयूआरएमचे विशेष प्रकल्प, नगररचना आणि दक्षता व गुणनियंत्रण या सर्व विभागांचे कामकाज आयुक्त स्वतः पाहणार आहेत.

अतिरिक्त आयुक्त (एक) प्रदीप जांभळे यांच्याकडील विभाग!

उद्यान व वृक्षसंवर्धन, अग्निशमन, शिक्षण, माध्यमिक शिक्षण, स्थापत्य (उद्यान), अतिक्रमण, विद्युत मुख्य कार्यालय, करसंकलन, पाणीपुरवठा व जलनि:सारण, जलशुद्धीकरण केंद्र सेक्टर 23, मध्यवर्ती भांडार, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण, स्थापत्य मुख्य कार्यालय, समाज विकास, सर्व क्षेत्रीय कार्यालये व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणारे सर्व विभाग (सार्वजनिक वाचनालय, प्रेक्षागृहांसह) आणि (PCMC News) आपत्ती व्यवस्थापन असे 16 विभाग त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत.

Pune Winter : पुणेकर घेत आहेत गुलाबी थंडीचा आस्वाद; तापमानात एक अंशानी वाढ

अतिरिक्त आयुक्त (दोन) जितेंद्र वाघ यांच्याकडे ‘हे’ आहेत विभाग!

प्रशासन, माहिती व तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय (बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय), क्रीडा, स्थापत्य (प्रकल्प), वैद्यकीय मुख्य कार्यालय, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, आरोग्य, आकाशचिन्ह व परवाना विभाग, निवडणूक व जनगणना, भूमि आणि जिंदगी, पर्यावरण अभियांत्रिकी, कायदा आणि बीआरटीएस प्रकल्प अशा 14 विभागाचे कामकाज त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

अतिरिक्त आयुक्त (तीन) उल्हास जगताप यांच्याकडील विभाग!

सुरक्षा, कार्यशाळा, नगरसचिव, माहिती व जनसंपर्क, झोनिपू, आयटीआय मोरवाडी व कासारवाडी, नागरी सुविधा केंद्र, अभिलेख कक्ष, बीएसयुपी, ई्डब्ल्यूस प्रकल्प, स्थानिक संस्था कर आणि कामगार कल्याण अशा 12 विभागाचे कामकाज जगताप यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

अतिरिक्त आयुक्तांनी या विभागांसाठी आयुक्तांच्या सर्व अधिकारांचा वापर करावा. विभागाची कर्तव्ये व कार्ये पार पाडावी. तथापि, त्यांच्या अखत्यारीतील विभागाअंतर्गतचे धोरणात्मक निर्णय घेण्यासंबंधिचे महापालिका, स्थायी समिती सभा यांना सादर करावयाचे सर्व प्रस्ताव आयुक्तांची मान्यता घेऊनच सादर करण्यात येतील. या अधिकारामध्ये बदल करणे अथवा निरस्त करण्याचे हक्क आयुक्तांनी स्वत:कडे राखून ठेवले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.