Pune : व्यवसायासाठी पैसे घेऊन एकाची 30 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – व्यवसायासाठी पैसे घेऊन एकाची 30 लाखांची फसवणूक घटना समोर आली आहे. नोव्हेंबर 2016 पासून कॅम्प येथील आझम कॅम्पसमध्ये ही फसवणूक करण्यात आली.

तन्वीर अब्दुल रहीम काझी (वय 46, कोंढवा खुर्द) याच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कॅम्प येथे राहणाऱ्या एका 52 वर्षीय इसमाने पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्प येथे राहणाऱ्या एका इसमाला तन्वीर काझी याने आझम कॅम्पस येथे बोलवून घेतले. त्याने चीनमधून कपडे खरेदी करून ते भारतात विकून पैसे कमवू म्हणून या व्यवसायासाठी फिर्यादीकडून वेळोवेळी धनादेशाद्वारे (चेकद्वारे) तब्बल 30 लाख रुपये घेतले.

परंतु तन्वीर याने फिर्यादी यांना खरेदी केलेले कपडे न देता ते स्वतः विकले. त्यानंतर फिर्यादीच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी तन्वीरकडे याबद्दल चौकशी केली. त्यावर तन्वीरने पैसे परत करतो असे सांगून फिर्यादी यांना धनादेश (चेक) दिले परंतु ते चेक बाऊन्स झाले.
तन्वीरकडे वारंवार पैसे मागून देखील त्याने ते परत न करता उलट त्यांनाच शिवीगाळ करून त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादी मध्ये म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास लष्कर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.