Pune News : तुळशीबाग गणपती मंडळ व तुळशीबाग व्यापारी असोसिएशनचा अनोखा उपक्रम

एमपीसी न्यूज – आपल्या आवडी – निवडीनुसार दिवाळी निमित्त नवे कपडे खरेदी करावे असे अनेकांना वाटते, त्यात पुणेकरांचे खरेदीचे आवडीचे ठिकाण तुळशीबाग येथून खरेदी करण्याच्या विचारांनी अनेकांची उत्कंठा शिगेला पोहोचते. मात्र प्रत्येकाला हे शक्य होते असे नाही, आर्थिक अडचणींच्या जंजाळामुळे खूप जणांना ते शक्य होत नाही. पण तो खरेदीचा आनंद वस्तीतील निराधार मुलींना देता यावा म्हणून श्री तुळशीबाग गणपती मंडळ व तुळशीबाग व्यापारी असोसिएशन च्या वतीने एक अनोख्या उपक्रम राबवण्यात आला. 

समाजातील काही घटकांच्या कुटुंबातील मुलींना दिवाळीनिमित्ताने कपडे खरेदी चा आनंद घेता येत नाही. त्यांना प्रत्यक्ष दुकानात जाऊन कपडे आणि इतर वस्तू स्वतःच्या इच्छेप्रमाणे खरेदी करण्याचा आनंद घेता यावा या उदात्त हेतुने तुळशीबाग मंडळ, तुळशीबाग व्यापारी यांच्या सहकार्याने गेली अनेक वर्षे हा अनोखा उपक्रम राबवित आहे.

तुळशीबाग बाजारपेठेचे आकर्षण खासकरून महिला वर्गाला फार असून येथे खरेदीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच तुळशीबाग ही महिलांचे माहेरघर समजले जाते. तिथे आपणही खरेदी करावी असे आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या मुलींना पण वाटते. त्यामुळे या उपक्रमाच्या माध्यमातून मुलींना तुळशीबागेत नेत खरेदीसाठी दुकानात घेऊन जातात. तुळशीबागेतील व्यापारी त्यासाठी सहकार्य करतात.

दरम्यान, जिजाऊ फाऊंडेशन या संस्थेने शैक्षणिक पालकत्व घेतलेल्या वस्तीतील मुलींना खरेदीसाठी तुळशीबाग बाजारपेठेत आणले होते. तुळशीबाग महागणपती ची आरती करुन खरेदीचा आनंद घेत सांगता कावरे आईस्क्रीम मनसोक्त खाऊन या मुलींनी केली. शिल्पकार विवेक खटावकर सर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत मुलींना सुद्धा मिठाई दिली.

विश्रामबाग पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मा.सुनिल माने साहेब, श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, शिल्पकार विवेक खटावकर सर, तुळशीबाग व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष नितीन पंडित, जिजाऊ फौडेशन च्या सौ.ज्योती ढमाल, श्रीमंत राजे पवार संस्थेचे अध्यक्ष सागर पवार,दत्ताभाऊ कावरे, विनायक कदम,मोहन साखरीया, किरण चौहान,सुनिल खेडेकर या प्रसंगी उपस्थित होते. या उपक्रमासाठी मीनल क्रिएशन चे किरण शेठ गाला यांचे विशेष सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.