Rahatani News: वीस वर्षांचा सौरभ राठी म्हणे ‘मी रहाटणीचा भाई’, खंडणी मागून सात गाड्यांच्या काचा फोडल्या

एमपीसी न्यूज – वीस वर्षीय सौरभ राठी या तरुणाने हातात कोयता घेऊन जोरजोरात ओरडत दहशत पसरवली. ‘मी रहाटणीचा भाई आहे, मला सगळ्यांनी हफ्ता द्यायचा,’ असे म्हणून सात गाड्यांच्या काचा फोडल्या. बुधवारी (दि.20) साई कॉलनी, रहाटणी येथे ही घटना घडली. वाकड पोलिसांनी आरोपी सौरभ राठी (वय 20, रा. रहाटणी, मुळगाव बीड) याला अटक केली आहे. काळु शिवराम गभाले (वय 29, रा. साई कॉलनी, रहाटणी) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  आरोपी राठी याने हातात कोयता घेऊन जोरजोरात ओरडत शिवीगाळ केली व परिसरात दहशत निर्माण केली. तसेच, ‘मी रहाटणीचा भाई आहे, मला सगळ्यांनी हफ्ता द्यायचा,’ असे म्हणून फिर्यादी यांच्याकडे एक हजार रुपये मागितले. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांच्या हातावर कोयत्याने वार केला. मात्र, फिर्यादी यांनी तो वार चुकवला. आरोपीने साई कॉलनी मध्ये लावलेल्या सात गाड्यांच्या काचा फोडून दहशत निर्माण केली. वाकड पोलिसांनी  आरोपीला अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.