Union Budget : बांधकाम क्षेत्राच्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडून काय आहेत अपेक्षा?

एमपीसी न्यूज – येत्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडून बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. काय आहेत त्यांच्या अपेक्षा सविस्तर जाणून घेऊया.

विशाल गोखले, व्यवस्थापकीय संचालक, गोखले कन्स्ट्रक्शन्स

गेली बरीच वर्षे निर्माणाधीन असलेल्या सदनिकांच्या विक्रीवर लावण्यात येत असलेला जीएसटी कमी करावा किंवा तो आकारण्यात येवू नये अशी मागणी बांधकाम क्षेत्राकडून केली जात आहे. यंदाच्या बजेट मध्ये या मागणी संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री आणि जीएसटी कौन्सिल सकारात्मक विचार करेल अशी अशा आहे. गेल्या काही वर्षात मोठी घरे घेण्याचे प्रमाण वाढत आहे. याचा विचार करता गृहकर्जाच्या व्याजावर मिळणारी आयकरातील सुट याची देखील व्याप्ती वाढवण्यात यावी. सध्या गृहकर्जावरील दिलेल्या 2 लाख रुपयांपर्यंतच्या व्याजावर आयकरात जी सवलत मिळते ती 5 लाखांपर्यंत वाढवण्यात यावी.

 

अनिल फरांदे, अध्यक्ष, क्रेडाई पुणे मेट्रो

‘2022 पर्यंत सर्वांसाठी घर’ या योजनेच्या दिशेने सकारात्मक पाऊल टाकत असताना स्वस्त गृहकर्ज, गृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी कर लाभ याबरोबरच घरांच्या मागणीला चालना देण्यासाठी दीर्घकाळ कर्ज परतफेड योजना यांसाठी क्रेडाई आपल्या परीने वेळोवेळी योगदान देत असते. परवडणारी घरे या क्षेत्रात कलम 80 आयबीएमध्ये सुधारणा करण्यात यावी, अशी आम्ही मागणी करतो, यामुळे घरखरेदीदारासोबतच बांधकाम व्यवसाय क्षेत्राचा देखील फायदा होईल. याबरोबरच आयकराचे कलम 71 (3 ए) हटवण्याबाबत केलेल्या आमच्या मागणीचा विचार होईल अशी आमची अपेक्षा आहे. यामुळे भाड्याच्या घरात राहण्याऐवजी स्वत:चे घर खरेदी करण्याला ग्राहकांना प्रोत्साहन मिळेल.

बांधकाम प्रकल्पांना जलद मंजुरी, जीएसटीवर क्रेडिट इनपुट सादर करणे आणि निधीची उपलब्धता वाढवणे याशिवाय वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही सरकारकडून अतिरिक्त मदतीची अपेक्षा करत आहोत.

 

अरविंद जैन , सचिव, क्रेडाई पुणे मेट्रो

कोविड-19 या काळात मोठ्या घरांची मागणी वाढली आहे. त्यातही परवडणाऱ्या घरांच्या व्याख्येत दुरुस्ती केल्यास घरांच्या विक्रीला चालना मिळेल. लहान शहरांमधूनही मोठ्या घरांची मागणी वाढत असल्याने परवडणाऱ्या घरांच्या व्याख्येत आता मोठ्या घरांचा समावेश करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे म्हणता येईल.

गृहनिर्माण कर्जाच्या मुद्दलाच्या परतफेडीची मर्यादा वाढवण्यासाठी किंवा मुद्दल परतफेडीच्या संदर्भात वजावटीसाठी कलम 80 सीमध्ये सुधारणा करण्याची आम्ही शिफारस करतो.

घर खरेदीची भावना वाढीस लागावी यासाठी कलम 24 (बी) अंतर्गत घर खरेदी करणाऱ्यांसाठी कर सवलत वाढवण्याचा आग्रह करतो आहोत. यामुळे गृहखरेदीदार रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित होतील शिवाय यामुळे बाजारात मागणी देखील वाढवेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.