Chinchwad News : ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना शहरात ठराविक वेळेत बंदी

एमपीसी न्यूज – शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना ठराविक वेळेसाठी बंदी घालण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सोमवारी (दि. 13) याबाबतचे आदेश दिले आहेत.

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कासरसाई येथे श्री. संत तुकाराम सहकारी साखर कारखाना आहे. शहरातून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची नेहमी वर्दळ असते. या वाहनांमध्ये जास्त वजन असल्याने तसेच, ट्रॅक्टरला एकापेक्षा जास्त ट्रॉली जोडल्याने ही वाहने संथ गतीने धावतात.

परिणामी वाहतूकीस अडथळा होऊन कोंडी होते. अनेकदा ऊस वाहतूक करणारी वाहने पलटी झाली, टायर फुटल्याने अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस उपआयुक्त आनंद भोईटे यांनी रहदारीच्या वेळेत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदीचे आदेश दिले आहेत.

ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत बंदी असेल. त्यानंतर दुपारी 1 ते सायंकाळी 5 पर्यंत शहरातून ऊस वाहतुकीस मुभा देण्यात आली आहे. त्यानंतर पुन्हा सायंकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर पुन्हा रात्री 9 ते सकाळी 9 पर्यंत ऊस वाहतूक करणारी वाहने शहरातून धावू शकतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.