Wakad: मैत्रिणीला भेटायला जाणं पडलं महागात; पत्नी आणि मुलांनी पकडलं

Wakad: husband visit a lady friend; Caught by wife and children and beaten संजय यांची पत्नी आणि दोन्ही मुले संजय यांच्या नकळत त्यांच्या मागे आली. मैत्रिणीच्या घरात संजय आणि त्यांची मैत्रीण या दोघांना पत्नी आणि दोन मुलांनी बघितले.

एमपीसी न्यूज- एका बांधकाम व्यावसायिकाला त्याच्या मैत्रिणीला भेटायला जाणे चांगलेच महागात पडले आहे. मैत्रिणीच्या घरी गेलेल्या बांधकाम व्यावसायिकाला पत्नी आणि त्याच्या मुलांनी रंगेहाथ पकडले. त्यानंतर घरी आणून बांधकाम व्यावसायिकाला झोडपूनही काढले. याबाबत पत्नी आणि दोन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रत्नदीप कॉलनी, लक्ष्मीतारा गार्डन, डांगे चौक, वाकड येथे रविवारी (दि.21) रात्री घडली.

संजय ओमप्रकाश ससाणे (वय 48, रा. रत्नदीप कॉलनी, लक्ष्मीतारा गार्डन, डांगे चौक, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पत्नी पोर्णिमा संजय ससाणे (वय 42), मुलगा दीपक संजय ससाणे (वय 21), देवांग संजय ससाणे (वय 18) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. रविवारी (दि.21) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास संजय त्यांच्या वाकड येथील एका मैत्रिणीला भेटायला गेले.

त्यावेळी संजय यांची पत्नी आणि दोन्ही मुले संजय यांच्या नकळत त्यांच्या मागे आली. मैत्रिणीच्या घरात संजय आणि त्यांची मैत्रीण या दोघांना पत्नी आणि दोन मुलांनी बघितले.

त्यानंतर पत्नी पोर्णिमा यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी पोर्णिमा, त्यांची मुले आणि पती संजय यांच्यात समझोता घडवून आणला आणि सर्वांना आपापल्या घरी जाण्यास सांगितले. त्यानुसार, संजय त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत घरी आले.

त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पत्नी पोर्णिमा आणि दोन्ही मुले संजय यांच्या बेडरुममध्ये आले. त्यांनी संजय यांच्याकडील मोबाईल फोन, गाडीची चावी काढून घेतली.

त्यानंतर पत्नीने संजय यांना पकडून ठेवले आणि मुलगा देवांग याने लाथाबुक्यांनी मारहाण केली. दुसरा मुलगा दीपक याने कंबरेच्या चामडी बेल्टने संजय यांना बेदम मारहाण केली.

यामध्ये संजय यांच्या खांद्यावर, तोंडावर व डोक्याला गंभीर दुखापत झाली. संजय यांना रक्तबंबाळ करून तिघेही निघून गेले. संजय यांनी पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली.

पोलिसांनी संजय यांच्या घरी जाऊन त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.