Nigdi Crime News : लग्नानंतर पतीचे बाहेरील प्रेमसंबंध आणि वादाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – लग्नानंतर पतीने दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध ठेवून विवाहितेला मानसिक व शारीरिक त्रास दिला. तिला मारहाण आणि शिवीगाळ केली. रोजच्या या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 23) दुपारी यमुनानगर, निगडी येथे घडली.

नितीन युवराज घारगे (वय 30, रा. यमुनानगर, निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी मयत महिलेच्या भावाने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीचा (वय 30) पती आरोपी नितीन याने लग्नानंतर दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध ठेवले. त्यावरून फिर्यादी यांच्या बहिणीला त्याने वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. त्या कारणावरून वाद काढून तिला कायम हाताने मारहाण व शिवीगाळ केली. दररोजच्या या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या बहिणीने राहत्या घरी पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

फिर्यादी यांच्या बहिणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी नितीन याच्याविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. निगडी पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.