Chakan News : वडगांव पाटोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार  

एमपीसी न्यूज : राजगुरूनगर जवळच्या वडगांव पाटोळे ( ता.खेड , जि. पुणे ) येथे  बिबट्याने झोपडीत झोपलेल्या महिलेवर हल्ला करून ठार केल्याची खळबळ जनक घटना बुधवारी (दि 1) उघडकीस आली. जनाबाई रामचंद्र गडदे , वय 60 असे बिबट्या च्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या वृद्ध महिलेचे नावं आहे. वडगांव पाटोळे मधील बोरदरा- साबळे वस्ती येथे ही महिला रहात होती. त्यांच्या भावाचे येथे घर असुन जवळच असलेल्या झोपडीत महिला वास्तव्यास होती.

नेहमीप्रमाणे मंगळवारी (दि 31) रात्री झोपल्यावर मध्यरात्री बिबट्या झोपडीत शिरला. झोपेत असलेल्या जनाबाई यांना ठार केले. झोपडी पासुन सुमारे 400 फुट अंतरावर शेतात त्यांचे अर्धवट शरीर आढळुन आले. सकाळी नेहमीप्रमाणे कुटुंबातील सदस्यांनी चौकशी केली असता जनाबाई आढळुन आल्या नाही. कुठे गेल्या असतील म्हणून काही काळ दुर्लक्ष झाले. मात्र चौकशी केली तेव्हा ही घटना समोर आली. झोपडी पासुन 400 फुटांवर शेतात मृतदेह मिळुन आला असुन मयताचे हातपाय बिबट्याने खाल्ले आहेत. वनविभागाने पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदन साठी पाठवण्यात आला आहे.

वडगांव पाटोळे परिसरात गेले तीन महिने एक, दोन बिबट्याचा तसेच त्यांच्या बछड्यांचा वावर आहे. रस्त्यावर एका महिलेला अचानक बिबट्या आडवा आला. दुचाकी स्वारावर हल्ला चढवला. त्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. यासारख्या अनेक घटना घडल्या होत्या. यामुळे गाव आणि परिसरात भीतीचे वातावरण होते. लोकं दिवसा शेतात किंवा कामानिमित्त बाहेर पडायला घाबरत होते. या घटनांच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने एकदा पिंजरा लावला होता. त्यात एक बिबट्या अडकला. तरीही बिबट्याचे दर्शन अनेकांना झाले होते. भीतीने नागरिकांना ग्रासलेले असताना आजच्या घटनेने चिंता वाढली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.