World Update: आशादायक! जगातील एका दिवसातील मृत्यूंच्या प्रमाणात तब्बल 24 टक्के घट

गेल्या 14 दिवसांत रविवारी सर्वात कमी बळी, अमेरिकेत आतापर्यंत एकूण 40 हजारहून अधिक मृत्यू

एमपीसी न्यूज – जगात एका दिवसातील नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत तसेच मृतांच्या संख्येत लक्षणीय घट होत असल्याचे दिसून येत आहे. जगात काल (रविवारी) 4 हजार 962 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. ती शनिवारच्या तुलनेत 23.72 टक्क्यांनी कमी आहे. गेल्या चौदा दिवसांतील हा मृतांचा सर्वात कमी आकडा आहे. नवीन कोरोनाबाधितांच्या नोंदीतही शनिवारच्या तुलनेत काल 8.5 टक्क्यांची घट दिसून येत आहे. काल एकूण 75 हजार नवीन रुग्ण सापडले. ही संख्या देखील गेल्या पाच दिवसांतील सर्वात कमी संख्या आहे. कोरोनाच्या प्रसाराचा वाढता वेग पाहून धास्तावलेल्या जगासाठी या दोन्ही गोष्टी खूपच आशादायक मानल्या जात आहेत. दरम्यान, अमेरिकेने काल कोरोना बळींचा 40 हजारांचा टप्पा ओलांडला.

जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 24 लाख 06 हजार 905 इतकी झाली असून कोरोनाच्या बळींची संख्या 1 लाख 65 हजार 059 इतकी झाली आहे. आतापर्यंत 6 लाख 17 हजार 013 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 16 लाख 24 हजार 833 इतके सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 15 लाख 70 हजार 615 रुग्णांचा आजार हा सौम्य प्रकारचा असून 54 हजार 218 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

जगातील कोरोनावाढीच्या व मृत्यूदराच्या आलेख अनेक चढ-उतार दिसून येत आहे. मात्र सलग गेल्या तीन दिवसांत दोन्ही आलेख घसरताना दिसत आहेत. कोरोनाची साथ आटोक्यात येण्यासाठी सर्वप्रथम नवीन कोरोना रुग्णांची भर पडणे कमी करणे व शेवटी पूर्णपणे थांबविणे सर्वात महत्त्वाचे आहे. त्याला अजून बरेच दिवस लागणार असले तरी त्या दिशेने पावले पडायला सुरूवात झाली आहे. जगात पाच एप्रिलला 4 हजार 739 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद आहे. त्यानंतर दररोज वाढ होत 14 एप्रिलला 10 हजार 761 ही मृतांची आतापर्यंतची विक्रमी संख्या नोंदवली गेली. त्यानंतर पुन्हा घट होऊन ती काल 4 हजार 962 वर आली आहे.

कोरोनाबाधित नव्या रुग्णांची संख्या 13 एप्रिलला 71 हजार 49 होती. ती वाढून 16 एप्रिलला 90 हजार 254 वर पोहचली होती. त्यानंतर ती घसरत काल 75 हजार पर्यंत खाली आल्याचे पाहायला मिळत आहे. 29 मार्चला 60 हजार 415 नवे रुग्ण सापडल्याची नोंद आहे जगात कोरोनाचा उद्रेक वाढल्यानंतरची ती सर्वात कमी संख्या आहे. तर 10 एप्रिलला तब्बल 93 हजार 740 एवढ्या नव्या रुग्णांच्या सर्वोच्च संख्येची नोंद झाल्याचे दिसून येते.

मागील सहा दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

14 एप्रिल – नवे रुग्ण 73 हजार 966     दिवसभरातील मृतांची संख्या 10 हजार 761

15 एप्रिल – नवे रुग्ण 84 हजार 515     दिवसभरातील मृतांची संख्या 7 हजार 959

16 एप्रिल – नवे रुग्ण 95 हजार 22       दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 996

17 एप्रिल – नवे रुग्ण 86 हजार 496       दिवसभरातील मृतांची संख्या 8 हजार 672

17 एप्रिल – नवे रुग्ण 81 हजार 930      दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 505

18 एप्रिल – नवे रुग्ण 75 हजार 000     दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 962

कोरोनाबाधितांच्या जागतिक क्रमवारीत टर्की आठव्या स्थानावरून सातव्या स्थानावर, रशिया 11 व्या स्थानावरून 10 व्या स्थानावर पोहचला आहे. भारत 17 व्या स्थानावर कायम आहे. बेल्जियम मात्र 10 व्या क्रमांकावरून 12 व्या क्रमांकावर गेला आहे. ब्राझील 12 व्या स्थानावरून 11 व्या स्थानावर आला आहे. पेरू 20 व्या स्थानावरून 18 व्या स्थानावर पोहचला आहे.

एकट्या अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 7 लाख 63 हजार 832 इतकी झाली आहे. मृतांची संख्या देखील 40 हजारांपेक्षा पुढे गेली आहे. स्पेनने देखील मृतांचा 20 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. ब्रिटनमध्ये मृतांचा आकडा 16 हजारच्या पुढे गेला आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 7,63,832 (+25,040), मृत 40,553 (+1,539)
  2. स्पेन – कोरोनाबाधित 1,98,674 (+4,258), मृत 20,453 (+410)
  3. इटली – कोरोनाबाधित 1,78,972 (+3,047), मृत 23,660 (+433)
  4. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,52,894 (+1,101), मृत 19,718 (+395)
  5. जर्मनी – कोरोनाबाधित 1,45,742 (+2,018), मृत 4,642 (+104)
  6. यू. के. – कोरोनाबाधित 1,20,067 (+5,850), मृत 16,060 (+596)
  7. टर्की – कोरोनाबाधित 82,329 (+3,977), मृत 2,017 (+127)
  8. चीन – कोरोनाबाधित 82,735 (+16), मृत 4,632 (+0)
  9. इराण – कोरोनाबाधित 82,211 (+1,343), मृत 5,118 (+87)
  10. रशिया – कोरोनाबाधित 42,853 (+6,060), मृत 361 (+48)
  11. ब्राझील – कोरोनाबाधित 38,654 (+1,932), मृत 2,462 (+101)
  12. बेल्जियम – कोरोनाबाधित 38,496 (+1,313), मृत 5,683 (+230)
  13. कॅनडा – कोरोनाबाधित 35,056 (+1,673), मृत 1,587 (+117) 
  14. नेदरलँड – कोरोनाबाधित 32,655 (+1,066) , मृत 3,684 (+83)
  15. स्वित्झर्लंड – कोरोनाबाधित 27,740 (+336), मृत 1,393 (+25)
  16. पोर्तुगाल – कोरोनाबाधित 20,206 (+521), मृत 714 (+27)
  17.  भारत – कोरोनाबाधित 17,615 (+1,250) , मृत 559 (+38)
  18. पेरू –  कोरोनाबाधित 15,628 (+1,208) , मृत 400 (+52)   
  19. आयर्लंडकोरोनाबाधित 15,251 (+493) , मृत 610 (+39)
  20. ऑस्ट्रीया – कोरोनाबाधित 14,749 (+78), मृत 452 (+9)       

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.