Article By Harshal Vinod Alpe : 83 हा चित्रपट – एक अविसमरणीय अनुभव !

एमपीसी न्यूज ( हर्षल विनोद आल्पे) : काही चित्रपट हे मुळातच चित्रपट नसतात, तर तो एक अनुभव असतो, एक विलक्षण अनुभव ! आणि हा अनुभव काहीजणांसाठी पुंनर्प्रत्ययाचा आनंद देणारा असतो, तर काहींना हा नव्याने मिळणारा आणि कधी ही न विसरता येणारा अनुभवच असतो .

83 या चित्रपटाचे ही असेच आहे , एकदा तुम्ही थिएटर च्या मोठ्या पडद्यावर हा अनुभव घ्यायला सज्ज झालात , की एका जागी बसून तुम्ही त्या काळात आणि त्या वातावरणात गेलात म्हणूनच समजा. 80 च्या दशकात आणि 90 च्या जमान्यात जर तुमचा जन्म असेल तर तुम्ही याच्या विविध कहाण्या ऐकल्या अथवा वाचल्या ही असतील. पण तरी ही जेव्हा मोठ्या पडद्यावर आपण हे सगळे बघतो ,तेव्हा तो सगळा काळच आपल्यासमोर आपल्या पाऊलखुणा दाखवू लागतो . आणि या पाऊलखुणा च 83 या चित्रपटात रोमहर्षक अनुभव देतातच यात शंका नाही .

दिग्दर्शक कबीर खान यांच्या संपूर्ण टिम ने अगदी आत्मियतेने आणि प्रामाणिकपणे हा चित्रपट केलाय हे जाणवते. यातील सगळीच पात्रे, आणि सगळे काही जीवंत करण्यासाठी प्रचंड कष्ट घेतल्याचे जाणवते. छोट्या छोट्या गोष्टींकडे ही चित्रपटात बारीक लक्ष दिल्याचे जाणवते . जिथे जुने काही उपलब्ध नसेल तिथे नव्याने काही गोष्टी निर्माण करून नव्याने तीच कहाणी सांगण्याचे मोठे कसब या चित्रपटात आहेच.

अभिनेता रणवीरसिंह याने यातली तशा अर्थाने मुख्य अशी ग्रेट क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका यात वठवली आहे, खर तर हे एक वाक्य झाले, लिहिण्यापूरते, पण खरे विचाराल तर रणवीर कपिल देव झालाय, असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. त्या संपूर्ण चित्रपटात आपल्याला कपिलदेवच दिसतात. इतका जिवंत अनुभव देण्यासाठी रणवीर ला काय काय करावे लागले असेल, हे फक्त तोच जाणे. अगदी कपिल यांच्या फक्त चेहेर्‍यावर येणारे हावभावच नव्हे, तर त्यांची मानसिकता ही रणवीर ने बरोबर पकडली आहे.

कुठे ही आक्रस्थाळेपणा नाही, कुठे ही आपण च हिरो आहोत याचा अटठास नाही, मी आत्ता कपिल देव यांचे जीवन जगतोय,एवढाच फक्त प्रामाणिक प्रयत्न मनापासून दिसतो. रणवीर च नव्हे , तर या चित्रपटातील इतर पात्रे साकारणारे कलाकार ती पात्र च वाटतात. त्या कलाकारांनी ही ती पात्र होण्याचा प्रामाणिक यशस्वी प्रयत्न च या चित्रपटाला खर्‍या अर्थाने एक वास्तववादी चित्रपट बनवतो.

जो नॉर्मल बाजारू फिल्म्स मध्ये असतो तसा कुठे ही मसाला नाही. उगाचच येणारी आयटम गाणी नाहीत, उगाचच कुणाला ही विलन करायचे नाही, फक्त प्रामाणिकपणे  1983 च्या क्रिकेट वर्ल्डकप मध्ये दैदीप्यमान यश मिळवणार्‍या आपल्या देशाच्या  हिरोज ना सलाम करण्याचा हा एक प्रयत्न आहे, आणि तो मनाला भावणारा आहे.

विशेष लक्षात राहणार्‍या गोष्टी म्हणजे पंकज त्रिपाठी ने साकारलेला पी .आर . मानसिंग जे की 1983 च्या वर्ल्डकप चे मेनेजर होते संघाचे, त्यांची भूमिका ही विशेष उल्लेखनीय वाटते. त्याच बरोबर दक्षिणेकडील अभिनेता जीवा याने साकारलेला कृष्णम्माचारी श्रीकांत यांची साकारलेली भूमिका तर निव्वळ लाजवाब.

ताहिर राज बासीन याने सुनील गावस्करांची भूमिका ही मस्तच केली आहे, त्या पात्राला संवाद कमी आहेत , पण चेहेर्‍यावरचा शांतपणा दाखवत त्याने सुनील गावस्कर अक्षरशा वास्तवात उभे केले आहेत. अभिनेता चिराग पाटील याच्यासाठी या चित्रपटात काम करणे म्हणजे एक शिवधनुष्यच असावे, कारण आपल्या वास्तवातील वडिलांची भूमिका म्हणजेच संदीप पाटील यांची भूमिका त्याने पडद्यावर सहज साकारली आहे, जे की खूप अवघड काम आहे.

अभिनेता साकीब सलीम ने या वर्ल्ड कप चा खरा हीरो म्हणजेच मोहिन्द्ऱ अमरनाथ उठावदारपणे साकारला आहे. गम्मत अशी की खरे मोहिन्द्ऱ अमरनाथ ही या चित्रपटात एका विशेष भूमिकेत आहेत. त्यांना पडद्यावर अभिनय करताना बघून फारच मजा येते . तसे खर्‍या कपिल देव यांचे दर्शन ही आपल्याला या चित्रपटात सुखावून टाकते. त्या काळातील दृश्य, फोटोज आणि नव्याने केलेल्या दृश्यांची जी काही सरमिसळ बेमालूमपणे केलेली आहे, ती खरोखरच मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासारखी च आहे.

विशेषत: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ची “ती” दृश्य पाहाताना तर आपण भारावून जातो , ती आनंदोत्सवाची दृश्ये पाहाताना तर आपल्याला डोळ्यात आनंदाश्रू येतात , ज्या वेळी लहानग्या सचिन तेंडुलकर ला एका विशिष्ट प्रसंगी या चित्रपटात दाखवले गेले आहे , तिथे तर आपल्या अश्रूंचा बांध च फुटतो . मिळणारे एक दैदीपायमान यश कसे भावी पुढच्या पिढ्यांना प्रेरणादायी ठरते , याचे ते जिवंत उदाहरण पडद्यावर ही त्याच जिवंतपणाचा अनुभव देते .

आणि हा जिवंतपणा , हा वास्तववादी प्रेरणा देणारा चित्रपट एकदा तरी प्रत्येकाने बघायलाच हवा आणि आपल्या लहाङ्ग्यांना दाखवायलाच हवा . भले ही तुम्ही क्रिकेटचे चाहते असाल किंवा नसाल ,तरी ही आपल्या मागच्या पिढ्या आपल्या देशाचे नाव जगात मोठे करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झटत होत्या , हे बघण्यासाठी तरी एकदा बघाच ….

धन्यवाद … 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.