Talegaon News : माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत तसेच घरातील विविध कारणांवरून विवाहितेचा छळ केला असल्याची फिर्याद एका महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पती, जाऊ, दीर आणि नणंद अशा चौघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी 32 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली असून राजमोहम्मद नुरमोहम्मद शेख, यास्मिन, दीर रसूल, सुलताना अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार भोंडवे वस्ती, रावेत येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2016 मध्ये फिर्यादी महिलेचा आरोपी राजमोहम्मद सोबत विवाह झाला. विवाहाच्या वेळी फिर्यादी यांच्या वडिलांनी त्यांना अडीच तोळे सोन्याचे दागिने स्त्रीधन म्हणून दिले. लग्नानंतर पतीचे नात्यातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे फिर्यादी यांना समजले. त्याबाबत चौकशी केली असता त्यांना याबाबत कोणास काही न सांगण्याची धमकी दिली.

फिर्यादी महिला गरोदर राहिल्यानंतर आरोपींनी त्यांना गोळ्या देऊन त्यांचा गर्भपात घडवून आणला. फिर्यादी यांची आई त्यांना भेटण्यासाठी सासरी आली असता त्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांना मारहाण केली. माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत आरोपींनी त्यांना वारंवार त्रास दिला. सासरच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी माहेरी आल्या. त्यानंतर त्यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक आणि अॅड. रोहित राजगुरव यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.