Nigadi : वाढत्या चो-यांमध्ये बंद सीसीटीव्हीची भर; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

एमपीसी न्यूज – यमुनानगर, निगडी परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट पसरला आहे. दररोज कुठे ना कुठे चोरीची घटना घडत आहे. मागील चार महिन्यात यमुनानगर परिसरात घरफोडी, वाहन चोरी, मोबाईल हिसकावणे असे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यात रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. या बंद कॅमे-यांकडे महापालिका प्रशासन बघत नाही. यामुळे याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, अशी माहिती भाजप शहर उपाध्यक्ष, युवा मोर्चा सोशल मीडिया आदित्य कुलकर्णी यांनी दिली.

यमुनानगरमधील प्रत्येक चौकात महापालिकेच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. परिसरात एखादी घटना घडल्यास पोलिसांना त्याची मदत व्हावी, या उद्देशातून हे कॅमेरे लावले आहेत. मात्र, मागील काही महिन्यांपासून हे कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे पोलिसांना देखील तपासामध्ये अडथळे येत आहेत.

  • महापालिकेने या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी ज्या कंत्राटदाराला नेमले आहे, त्याची महापालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही सीसीटीव्ही दुरुस्ती अथवा पर्यायी व्यवस्था करण्यात येत नाही.

यमुनानगर परिसरात वाढत्या चो-यांच्या घटनांवर महापालिका प्रशासन आणि सीसीटीव्ही कंत्राटदार यांचा वरदहस्त आहे का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. परिसरात एखादा अनुचित प्रकार घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे का? एखादी अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी महापालिका प्रशासन घटणार का? सीसीटीव्हीचा कंत्राटदार का बदलला जात नाही? असे अनेक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत. तसेच यावर तात्काळ उपाय न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.