Pimpri : शिक्षण समिती सदस्यांच्या कार्यकाळ संपला; शनिवारी नवीन सदस्यांची निवड 

महासभेत नवीन सदस्यांची होणार निवड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीतील सदस्यांचा एका वर्षांचा कार्यकाळ  8 जुलै रोजी संपला आहे. या समितीच्या नवीन नऊ सदस्यांची निवड येत्या शनिवारी (दि. 20) होणा-या महासभेत केली जाणार आहे.

महापालिकेच्या शिक्षण मंडळातर्फे शालेय साहित्य खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य शासनाने सर्व महापालिकेतील शिक्षण मंडळे बरखास्त केली. मंडळ बरखास्त झाल्याने शिक्षण विभागाचे सर्व कामकाज आयुक्तांच्या अधिकार कक्षेत समाविष्ट करण्यात आले. शिक्षण विभागाचे स्वतंत्र अर्थसंकल्प रद्द करून तो महापालिकेच्या मुख्य अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आला. विविध विषय समितीप्रमाणे शिक्षण समितीची स्थापना 22 जून 2018 ला करण्यात आली.

पक्षीय बलाबलानुसार नवीन सदस्यांची निवड केल्यानंतर  9 जुलै 2018 रोजी समितीच्या सभापतीपदीची निवड करण्यात आली होती. भोसरीच्या प्रा. सोनाली गव्हाणे यांना समितीच्या पहिल्या सभापती तर निगडीच्या शर्मिला बाबर यांना उपसभापती होण्याचा मान मिळाला. मनमानी कारभार आणि विषयपत्रिकेवर विषय न आणता ऐनवेळी उपसूचना देऊन परस्पर मंजुरी देण्याच्या पद्धतीमुळे विरोधी सदस्यांनी समिती सभेवर बहिष्कार घातला होता. शिक्षण समितीवर सातत्याने भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते.

महापालिकेतील पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपचे पाच,  राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेच्या एका अशा नऊ सदस्यांची शनिवारी होणा-या महासभेत निवड केली जाणार आहे. विषय समितीत वर्णी न लागलेल्या नगरसेवकांनी शिक्षण समितीत संधी मिळावी, यासाठी नेत्यांकडे ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.