Lonavala : शहर व ग्रामीण परिसरात घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन

एमपीसी न्यूज – गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात आज लोणावळा व ग्रामीण परिसरात घरोघरी गणपती बाप्पांचे जल्लोषात आगमन झाले. संकटमोचन गणरायांचे आज गणेश चतुर्थी निमित्त भक्तांच्या घरी आगमन झाले. भल्या पहाटेपासून गणपती प्रतिष्ठापनाची लगबग पहायला मिळत होती. गावांमध्ये ब्राम्हण तात्यांच्या हस्ते मुर्ती प्रतिष्ठापना करण्य‍ची प्रथा असल्यामुळे सर्वत्र तात्यांची शोधाशोध व पळवापळवी हे चित्र पहायला मिळत होते. बाप्पांच्या आगमनाने सर्वत्र आनंदाचे व चैतन्याचे वातावरण पसरले होते. 
यावर्षी घरोघरी गणेशमूर्तीच्या शेजारी पर्यावरण पूरक आरास तसेच स्वच्छतेचे संदेश देणारे फलक पाहायला मिळत होते. ग्रामीण भागात गावतळ्यावरुन गावातील मूर्त्या आणत बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली. मोदकांचा नैवेद्य व गोडधोड पदार्थांनी बच्चे कंपनी आनंदीत होती.     दुपारनंतर बाजारभागातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांच्या बाप्पांचे वाजतगाजत आगमन झाले. ढोल ताश्यांच्या गजरात गुलालाची उधळण करत भव्य मिरवणुका काढत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

लोणावळा शहरात मानाच्या बाप्पांसह लहान मोठी 50 सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे आहेत. दुपारनंतर या बाप्पांच्या मिरवणुका काढण्यास सुरुवात झाली. मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाखण्याजोगा होता. विघ्नविनाशक गणपती बाप्पांचे आगमन हे निर्विघ्नपणे पार पाडण्याकरिता लोणावळा शहर पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला होता. सार्वजनिक गणेश मंडळांनी देखील स्वच्छतेवर आधारित डेकोरेशन करण्यावर भर दिला आहे. गणरायाच्या आगमनामुळे मागील दोन दिवसांपासून संततधार पडणारा पाऊस थांबल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.