Pune News: मृत मुलाचे मित्र असल्याचे भासवून वृद्ध महिलेचे दागिने पळवले
फिर्यादी महिलेनेही त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवला. त्यांनी फिर्यादी महिलेसोबत बराच वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर फिर्यादी महिलेच्या अंगावर असलेले दागिने जवळून पाहण्यासाठी मागितले.
एमपीसी न्यूज- दीड महिन्यांपूर्वी मृत्युमुखी पडलेल्या तुमच्या मुलाचे आम्ही मित्र असून तुम्हाला भेटण्यासाठी आलो आहोत, असे सांगून दोन अज्ञात व्यक्तींनी 70 वर्षीय वृद्ध महिलेचे 74 हजारांचे दागिने लंपास केले. ही घटना जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 14 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी चांगुणाबाई लक्ष्मण भोसले (वय 70) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑगस्टच्या सकाळी फिर्यादी महिला ही घरात बसली होती. यावेळी दोन अनोळखी व्यक्ती घरात आले. यावेळी त्यांनी फिर्यादी महिलेला तुमचा दीड महिन्यांपूर्वी मृत झालेला मुलगा आमचा मित्र होता. त्यामुळे आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहोत असे सांगितले.
फिर्यादी महिलेनेही त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवला. त्यांनी फिर्यादी महिलेसोबत बराच वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर फिर्यादी महिलेच्या अंगावर असलेले दागिने जवळून पाहण्यासाठी मागितले. फिर्यादीनेही त्यांच्यावर विश्वास ठेवत दोन तोळ्यांची सोन्याची मोहनमाळ आणि मंगळसूत्र त्यांना पाहण्यासाठी दिले. हे सर्व घेऊन आरोपी पळून गेले आहेत. आरोपींनी एकूण 73,999 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक माने करीत आहेत.